पतीच्या पाठपुराव्यामुळे डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

कोठंबी-पाळीतील महिलेचा प्रसुतीदरम्यान मृत्यू प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September, 12:35 am
पतीच्या पाठपुराव्यामुळे डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

म्हापसा : कोठंबी-पाळी, डिचोली येथील ४१ वर्षीय महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला होता. सरकारी अधिकारी असलेल्या पतीने आपल्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला. परिणामी गोमेकॉच्या रिड्रेसल समितीच्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी म्हापशातील त्या खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यासाठी २० महिन्यांची प्रतिक्षा महिलेच्या पतीला करावी लागली.

डॉक्टर दाम्पत्यावर बेजबाबदार व निष्काळजीपणाचा ठपका गोमेकॉच्या रिड्रेसल समितीने ठेवला आहे. डॉक्टर हा त्या खासगी हॉस्पिटलचा प्रमुख, तर महिला डॉक्टर या हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख आहेत.

सदर हॉस्पिटलमध्ये प्रसुती झाल्यावर दोन जुळ्या गोंडस बाळांना महिलेने जन्म दिला होता. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घरी पाळणा हालल्यामुळे पती -पत्नी तसेच कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत झाला होता. मात्र, प्रसुतीनंतर अवघ्या चार पाच दिवसांतच या महिलेचा मृत्यू झाला. तर, काही दिवसांनी जुळ्या मुलांतील एका बाळाचा मृत्यू झाला.

प्रसुतीनंतर आपल्या पत्नीची बिघडलेली तब्येत, तिला होणारे त्रास, पुढील उपचारार्थ गोमेकॉत हलविण्यासाठी रूग्णवाहिका तसेच इतर न मिळालेल्या वैद्यकीय सुविधा, हॉस्पिटलकडून झालेला बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणाचा अनुभव प्रत्यक्षात फिर्यादी पतीने घेतला होता.

पत्नीच्या जाण्याचा विरह, मातृत्वाअभावी एका बाळाला आलेले मरण आणि मातृत्वासाठी डोळे वटाळून पाहणारे दुसरे बाळ. हा आपल्यासोबत घडलेला प्रसंग दुसऱ्या कुणाबरोबर घडू नये व निष्पाप मातांचे बळी जाऊ नयेत, अशी मनाची धारणा करून पोलिसांत तक्रार दिली. न्यायासाठी पत्नीच्या मृत्यू प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला आणि शेवटी रिड्रेसल समितीचा अहवाल त्यांच्या बाजूने आला. म्हापसा पोलिसांनी त्यानुसार गुन्हाही नोंद केला आहे.

दरम्यान, ही घटना दि. २२ डिसेंबर ते दि. २७ डिसेंबर २०२३ दरम्यान घडली होती. पीडित ४१ वर्षीय महिलेला प्रसुतीसाठी तिच्या कुटुंबियांनी म्हापशातील सदर खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिने दोघा जुळ्या बाळांना जन्म दिला होता.

परंतु, या प्रसुती दरम्यान हॉस्पिटलकडून तिची व्यवस्थित काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली. महिलेला बांबोळीतील गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवण्यात आले. तिथे उपचारावेळी तिचे निधन झाले.

समितीच्या अहवालानंतर गुन्हा दाखल

महिलेच्या मृत्यूनंतर म्हापसा पोलिसांनी या प्रकरणाची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. तसेच तिच्या पतीने केलेली तक्रार गोमेकॉच्या रिड्रेसल समितीकडे वर्ग केली होती. समितीचा अहवाल आल्यावर दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा