गोवा नागरी सेवेतील ३८ जागांवर होणार भरती

अर्ज करण्याची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत


06th September, 12:27 am
गोवा नागरी सेवेतील ३८ जागांवर होणार भरती

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा लोकसेवा आयोगातर्फे (जीपीएससी) राज्य नागरी सेवा कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या ३८ जागांवर भरती होणार आहे. सर्व जागांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ सप्टेंबर आहे. उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याने जीपीएससीने ६० गुणांची अतिरिक्त पूर्व छाननी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूण ३८ जागांपैकी ११ ओबीसी, ५ ईडब्ल्यूएस व ६ जागा एसटी उमेदवारांसाठी राखीव आहेत. १६ जागा अनारक्षित आहेत. सर्व जागांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे असून सुधारित मेट्रिक्स लेव्हल १० प्रमाणे वेतन दिले जाईल. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. नियमानुसार काही उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल ५० वर्षांपर्यंत वाढवण्यात येईल. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचना वाचणे आवश्यक आहे. अर्जावर मोबाईल क्रमांक आणि ई-मेल योग्य पद्धतीने लिहावे, असे आवाहन आयोगाने केले आहे.
सीबीआरटी ७५ गुणांची
पूर्व छाननी परीक्षा ७५ मिनिटांची असेल. यामध्ये उमेदवारांना ६० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. अनुत्तीर्ण उमेदवारांना आणखी एकदा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. यासाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. त्यांना आयोगातर्फे याविषयी कळविण्यात येईल. यानंतर पात्र उमेदवारांची ७५ गुणांची सीबीआरटी घेण्यात येईल. सीबीआरटीमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची चार टप्प्यांत लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा एकूण २५० गुणांची असेल. यामध्ये पात्र उमेदवारांना तोंडी परीक्षेसाठी बोलावले जाईल. तोंडी परीक्षा ४० गुणांची असेल.