अनिता राठोड संशयास्पद मृत्यू प्रकरण
म्हापसा : खालचावाडा-हरमल येथे फेब्रुवारीत घडलेल्या अनिता राठोड (मूळ गाव गदग, कर्नाटक) हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी पती अनिल राठोड आणि सासरा कुशेलप्पा राठोड यांना म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
न्यायाधीश अपूर्वा नागवेकर यांनी जामीन मंजूर करताना दोघांवर कठोर अटी लादल्या आहेत. अनिल राठोड याला ५० हजार तर कुशेलप्पा राठोड यांना ३० हजार रुपयांची जामीन रक्कम जमा करावी लागणार आहे. दोघांनीही तेवढ्याच रकमेचे हमीदार उभे करणे बंधनकारक आहे. साक्षीदारांना धमकी न देणे, न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप न करणे. महिन्यातून एकदा चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावणे. प्रत्येक सुनावणीला हजर राहणे, न्यायालयाची परवानगी न घेता देशाबाहेर प्रवास न करणे या अटी घालण्यात आल्या आहेत.
या प्रकरणात संशयितांपक्षातर्फे अॅड. आर. देसाई यांनी बाजू मांडली, तर सरकारी पक्षाचे प्रतिनिधित्व सरकारी वकील आर. बार्रेटो यांनी केले. तक्रारदारामार्फत अॅड. एम. उसगावकर यांनी युक्तिवाद केला.
२२ फेब्रुवारी रोजी अनिता राठोड हिने राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्या वेळी तिची मुलगी दीड वर्षांची होती. तिच्या वडिलांनी आणि भावाने हा प्रकार हुंडाबळीचा असल्याचा आरोप करत मांद्रे पोलीस व पेडणे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, विवाहानंतर (१८ मे २०२२) ते मृत्यूच्या दिवशी (२२ फेब्रुवारी २०२५) दरम्यान पतीसह सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला होता. या तक्रारीच्या आधारे मांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवून मार्चच्या पहिल्या आठवड्यात अनिल राठोड, त्याचे वडील कुशेलप्पा, भाऊ रमेश, आई निर्मला आणि बहीण सुजाता यांना अटक केली होती. यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मे महिन्यात रमेश, निर्मला आणि सुजाता यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. अखेर गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी पती अनिल व सासरा कुशेलप्पा राठोड यांनाही जामीन मंजूर करून सुटका करण्यात आली.