दस्तावेज जप्त : युको बँकेची २.६३ कोटींची फसवणूक
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या सोन्याचा दर्जा तपासणाऱ्या विश्वासार्ह सोनारानेच बँकेला चुना लावल्याची घटना घडली. सोन्याचे भासवून बनावट दागिने तारण ठेवून युको बँकेची तब्बल २.६३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बँकेचा सोनार हेमंत रायकर (रा. कोलवा) आणि गुंडू यल्लपा केलवेकर (रा. मुगाळी-सां जुझे द आरियल) यांच्या घरांवर गुरुवारी रात्रीपासून छापा टाकला. यात मोठ्या प्रमाणात दस्तावेज आणि इलेक्ट्रॅानिक यंत्रणा जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) ऑक्टोबर २०२२ मध्ये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी युको बँकेचे सरव्यवस्थापक ज्ञानंद शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित हेमंत रायकर (कोलवा) हा आमच्या बँकेचा विश्वासार्ह सोनार आहे. सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनी बँकेत तारण म्हणून ठेवण्यासाठी दिलेल्या सोन्याचा दर्जा तपासून दागिन्यांचे मूल्यांकन करण्याचे काम तोच करत होता. त्याने संशयित गुंडू यल्लपा केलवेकर याच्याशी संगनमत करून जुलै २०१९ ते डिसेंबर २०२१ या दोन वर्षे पाच महिन्यांच्या कालावधीत वेर्णा, फातोर्डा आणि मडगाव येथील युके बँकेच्या शाखांमधून बनावट सोन्याचे दागिने (येलो गोल्ड) तारण ठेवले. या माध्यमातून विविध व्यक्तींच्या नावाने एकूण २,६३,०७,२८० रुपये कर्ज उचलण्यात आले. त्यासाठी रायकर यांनी बनावट दागिन्यांना खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
या तक्रारीची दखल घेऊन ईओसीचे पोलीस निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी वरील दोघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दोघांना प्रथम ईओसीची कोठडी ठोठावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आता त्या दोघांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
मनी लॉन्ड्रिंगचा संशय आल्याने ईडीची कारवाई
या प्रकरणाची दखल घेऊन सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यात मनी लॉन्ड्रिंगचा संशय आल्याने ईडीने तक्रार नोंद करून कारवाई सुरू केली. या प्रकरणी अतिरिक्त संचालक अवनीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक प्रफुल्ल वाबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सोनार हेमंत रायकर याच्या कोलवा येथील, तर गुंडू यल्लपा केलवेकर याच्या मुगाळी-सां जुझे द आरियल येथील घरांसह इतर ठिकाणांवर गुरुवारी रात्री छापा टाकला. ही छाप्याची कारवाई शुक्रवारी सायंकाळी पूर्ण झाली. या छाप्यात ईडीने मोठ्या प्रमाणात दस्तावेज आणि इलेक्ट्रॅानिक यंत्रणा जप्त केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.