१५ दिवसांची मुदत : ‘इन्व्हेंटरी प्रोसिडिंग’ करून मालमत्ता केल्या नावावर
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार रोहन हरमलकर याच्याशी संबंधित २१२.८५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली. त्यातील २९.२४ कोटी रुपयांच्या १५ मालमत्ता न्यायालयाकडून इन्व्हेंटरी प्रोसिडिंग केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईडीने जाहीर नोटिसीद्वारे १५ दिवसांत दावा करण्यास सांगितले आहे.
म्हापसा पोलिसांनी जमीन हडप प्रकरणात रोहन हरमलकरच्या विरोधात दोन गुन्हे दाखल केले होते. दोन्हींचा तपास एसआयटीकडे वर्ग केला होता. मनी लॉन्ड्रिंगचा संशय असल्याने ईडीने २४ एप्रिल रोजी हरमलकरच्या पिळर्ण, पर्वरी, दिवाडी आणि इतर ठिकाणच्या मालमत्तांवर छापा टाकला होता. यामध्ये १ हजार कोटींपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेल्या हणजूण, हडफडे, आसगाव व इतर ठिकाणच्या जमिनींची बनावट कागदपत्रे व ६०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तांची अस्सल कागदपत्रे जप्त केली होती. ईडीने हरमलकरला ३ जून २०२५ रोजी अटक केली. याच दरम्यान हरमलकरने अल्कांत्रो डिसोझा व इतरांसह षड्यंत्र रचून मिळवलेली २१२.८५ कोटींची मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली. त्यात हणजूण, रेवोडा, नादोडा, कामुर्ली, पर्रा आणि बार्देश तालुक्यातील इतर मालमत्तांचा समावेश आहे.
ईडीने वरील मालमत्ता संदर्भात चौकशी केली असता, १५ मालमत्ता वेगवेगळ्या न्यायालयांकडून इन्व्हेंटरी प्रोसिडिंग करून घेतल्याचे समोर आले. संबंधित मालमत्तांच्या एक चौदा उतारावर अनेक व्यक्तींची नावे आहेत. मात्र, त्या व्यक्ती बनावट असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला. संशयितांनी वरील १५ मालमत्तांसंदर्भात २९.२४ कोटी रुपये मिळविल्याचे (पीओसी) समोर आले आहे. त्यामुळे ईडीने त्या १५ मालमत्तांसंदर्भात जाहीर नोटिसीद्वारे १५ दिवसांत दावा करण्यास सांगितले आहे.