ट्रायचा अहवाल : डाऊनलोड स्पीडमध्ये जिओ अव्वल
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात बीएसएनएल मोबाईल सेवेचा कॉल ड्रॉप दर सर्वाधिक ३.९४ टक्के, तर एअरटेलचा सर्वांत कमी केवळ ०.४३ टक्के आहे. डेटा डाऊनलोड स्पीडमध्ये जिओ अव्वल ठरले. जिओच्या ४ आणि ५ जी नेटवर्कद्वारे प्रति सेकंद १४३.९४ एमबी डाऊनलोड स्पीड आहे. भारतीय दूरसंचार विनिमय प्राधिकरणाच्या (ट्राय) सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे.
‘ट्राय’ने वास्को, कोलवा, कुंकळ्ळी, केपे, दवर्ली, मडगाव, वेर्णा, बांबोळी, मिरामार, पणजी कदंब बसस्थानक परिसर, पणजी मार्केट, मांडवी पूल, गोमेकॉ येथे चाचण्या केल्या होत्या. यामध्ये एकूण २६१.८ किमीचा शहर परिसर, ३.९ किमीचा किनारी भाग, ८.९ किमीची चालत केलेली चाचणी आणि ९ सार्वजनिक हॉटस्पॉट यांचा समावेश होता.
अहवालानुसार, बीएसएनएलनंतर व्होडाफोन - आयडियाचे (व्हीआय) कॉल ड्रॉप १.२७ टक्के, जिओचे ०.६२ टक्के, तर एअरटेलचे सर्वांत कमी ०.४३ टक्के होते. जिओमध्ये कॉल यशस्वीपणे लागण्याचा दर सर्वाधिक ९९.१८ टक्के राहिला. जिओमध्ये कॉल सुरू असताना अचानक आवाज जाण्याचे प्रमाण (कॉल म्युट) २.५५ टक्के होते. एअरटेलमध्ये कॉल म्युटचे प्रमाण २.४८ टक्के, तर व्हीआयमध्ये १.९८ टक्के होते. बीएसएनएलमध्ये कॉल म्युटचे प्रमाण समजले नाही.
वाय-फाय हॉटस्पॉटमध्ये एअरटेल अव्वल
अहवालानुसार, वायफाय हॉटस्पॉटमध्ये एअरटेल अव्वल ठरले आहे. एअरटेलला (५ जी) प्रति सेकंद १७८.७० एमबी डाऊनलोड स्पीड मिळाले. जिओला १५७.०२ एमबी प्रति सेकंद स्पीड मिळाले. बीएसएनएल आणि व्हीआयचे (दोन्ही ४ जी) डाऊनलोड स्पीड अनुक्रमे १.१५ एमबी आणि ३७.६१ एमबी प्रति सेकंद होते.