गोवकरांना शनिवारी बेळगाव प्रवास टाळण्याचा सल्ला
विसर्जन मिरवणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी रुटमार्च काढला. (लुईस रॉड्रिग्स)
बेळगाव : शनिवारी बेळगावात श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले असून, गोव्यातील नागरिकांना या दिवशी बेळगावात प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुपारपासून मिरवणुकीमुळे शहरातील रस्ते गर्दीने भरतील. त्यामुळे दुपारनंतर शहरातील बहुतांश दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद राहणार आहेत.
बेळगाव शहर पोलिसांनी ६ सप्टेंबर (शनिवार) व ७ सप्टेंबर (रविवार) रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक वळविली असून निर्बंध जाहीर केले आहेत. मिरवणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी व मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी बंगळुरूहून आयजीपी संदीप पाटील बेळगावात दाखल झाले असून, शहरात ५०० पोलीस अधिकारी, जवळपास ३००० पोलीस कर्मचारी तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. मिरवणुकीवर १४ ड्रोन आणि ७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे.
मुख्य विसर्जन मिरवणूक ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता सुरू होईल. ही मिरवणूक नारगुंदकर भावे चौक, मारुती गल्लीतून, हुतात्मा चौक, रामदेव गल्लीतून, समादेवी गल्ली, बोगारवेस, रामलिंगखिंड गल्ली, कापिलेश्वर रेल्वे उड्डाणपूल मार्गे जाऊन कापिलेश्वर तलाव येथे समाप्त होईल.
मिरवणूक सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी प्रमुख चौकांत वाहतूक वळवण्यात आली आहे. गोव्याकडून खानापूर रोड, पिरनवाडी आणि तिलकवाडीमार्गे येणारी वाहतूक गोवावेस, ग्लोब टॉकीज तसेच मिलिटरी महादेव मार्गे वळवली जाणार आहेत. तर धारवाड रोड व काँग्रेस रोडकडून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे. जड वाहने, मालवाहतूक गाड्या व टेम्पो यांना शहरातील मिरवणुकीच्या मार्गावरील आतल्या रस्त्यांवर प्रवेश दिला जाणार नाही. मिरवणुकीच्या मार्गावर पार्किंगवर पूर्णत: बंदी असून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक बसेस, ऑटो व खासगी वाहने पोलीसांनी दाखवलेल्या मार्गावरून वळविण्यात येतील.
ॲम्ब्युलन्स व अग्निशामक वाहने यांना प्राधान्याने मार्ग दिला जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करून गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषतः छत्रपती चौक ते काकतीवेस व पोतदार क्रॉसपर्यंतचा मार्ग शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला आहे.
डिजे, फटाक्यांवर बंदी
मुख्य मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी डीजे वाजवणे तसेच फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरदार मैदान, बेयनॉन स्मिथ, सीपीईडी मैदान तसेच विविध शाळा व महाविद्यालयांच्या जागेत विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. हे निर्बंध ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून लागू राहतील आणि ७ सप्टेंबर रोजी विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कायम राहतील, अशी माहिती आयुक्त बोरसे यांनी दिली.