म्हापसा : शिवोलीत गुन्हे शाखेची धडक छापेमारी : नायजेरियन ड्रग पेडलर जेरबंद

कोकेन-मेथ-एमडीएमए व लाखोंची रोकड जप्त

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th September, 10:45 am
म्हापसा : शिवोलीत गुन्हे शाखेची धडक छापेमारी : नायजेरियन ड्रग पेडलर जेरबंद

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने शिवोली - बार्देश परिसरात ड्रग्ज तस्करी प्रकरणी कारवाई करून एझियाशी आयकेचुक्वू कॅलिस्टस (३८) या नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून ८.५० लाख रुपये किमतीचा ३५.५९३ ग्रॅम कोकेन, ४.४८५ ग्रॅम मेथॅम्फेटामाइन, २.२९४ ग्रॅम एमडीएमए हा ड्रग्ज जप्त केला आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मार्ना - शिवोली येथे भाड्याच्या खोलीत राहणारा नायजेरियन ड्रग्ज तस्करीत गुंतल्याची माहिती गुप्तहेरांनी दिली होती. त्यानुसार, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक लक्षी आमोणकर, प्रशल नाईक देसाई, मंगेश वळवईकर, उपनिरीक्षक अमीन नाईक, उपनिरीक्षक प्रगती मळीक, सहाय्यक श्रीराम साळगावकर, कॉ. स्वप्निल सिमेपुरुषकर, आदर्श गावस व इतर पथकाने मार्ना - शिवोली येथे एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकला. पथकाने एझियाशी आयकेचुक्वू कॅलिस्टस (३८) या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेऊन खोलीची झडती घेतली. त्याच्याकडून ८.५० लाख रुपये किमतीचा ३५.५९३ ग्रॅम कोकेन, ४.४८५ ग्रॅम मेथॅम्फेटामाइन, २.२९४ ग्रॅम एमडीएमए हा ड्रग्ज जप्त केला. या प्रकरणी उपनिरीक्षक अमीन नाईक यांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.

२६.७१ किलो ड्रग्जची विल्हेवाट

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून जप्त केलेल्या २६.७१ किलो ड्रग्जची कुंडई येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या इन्सिनरेटरमध्ये विल्हेवाट लावली. यावेळी गोवा पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा, एएनसीचे अधीक्षक सुनीता सावंत, मुख्यालयाचे अधीक्षक धर्मेश आंगले, एफडीएचे उपसंचालक स्वाती लाड, उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क, निरीक्षक संजीत पिल्ले आणि मीरा डिसिल्वा उपस्थित होते. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये ४९ किलो ड्रग्जची विल्हेवाट लावण्यात आली होती.


हेही वाचा