चांगला शिक्षक कोण तर ज्यांच्या हाताखाली चांगली पिढी घडते आहे, विद्यार्थ्यांचा प्रिय, शाळेच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेला, ज्यांच्या बदलीमुळे शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे डोळे पाणावतात अशा होतकरू शिक्षकांचा सन्मान फार कमी होतो, असेच सध्याचे चित्र आहे. ऋषी वसिष्ठांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार हे 'विशिष्ट' लोकांना दिले जाणारे पुरस्कार ठरू नयेत.
शिक्षण खात्याने 'मुख्यमंत्री - वसिष्ठ गुरू शिक्षक' पुरस्कारांची घोषणा केली. चांगल्या शिक्षकांचा गौरव व्हावा यासाठी हे पुरस्कार आहेत. यात गोव्यातील अनेक चांगल्या शिक्षकांना यापूर्वी गौरविण्यात आले, ज्यांना नंतर राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले. या वर्षासाठी मुख्यमंत्री वसिष्ठ गुरू शिक्षक पुरस्कारांसाठी खात्याने दहा शिक्षकांची निवड केली. निवडलेल्या शिक्षकांच्या पात्रतेविषयी निश्चितच दुमत नसावे. पण एकाच यादीत चित्रकलेच्या विषयाशी संबंधित दोन शिक्षकांना पुरस्कार दिले गेल्यामुळे साहजिकच अनेकांना प्रश्न पडला. हे पुरस्कार वशिल्याने दिले जाऊ नयेत. ते तसे घेण्याचा प्रयत्नही होऊ नये. या पुरस्कारांवर मेहनती, शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी दिवस - रात्र प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचाच हक्क असावा.
काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात वशिल्याने पुरस्कार घेण्यासाठी आपल्याकडे काही शिक्षक येतात, असे म्हणून सर्वांसमोर पुरस्कारांसाठी हपापलेल्या शिक्षकांची चांगली जिरवली होती. असे म्हटले म्हणून मुख्यमंत्र्यांकडे किंवा मंत्र्यांकडे कोणी शिफारशीसाठी जाणार नाही, असे कदापि होणार नाही. कितीतरी शिक्षक शाळेच्या विकासासाठी राबून निवृत्त झाले. त्यांना मुदतवाढही मिळाली नाही तसेच पुरस्कारही. पण जे लोक राजकीय नेत्यांच्या अवतीभवती दिसतात, शाळेचे काम कमी आणि राजकीय नेत्यांच्या अवतीभवती जास्त फिरतात, त्यांना जर पुरस्कार दिले जाऊ लागले तर प्रामाणिक शिक्षकांवर हा अन्याय नाही का?
पुरस्कार निवडीसाठी पारदर्शक पद्धती अवलंबली जावी, इतकेच नव्हे तर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय अशा वेगवेगळ्या गटांत वेगवेगळ्या विषयांसाठी शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे. जुन्याच पद्धतीत राहून पुरस्कारांची खिरापत वाटण्यापेक्षा नव्या बदलांचा विचार करून प्रत्येक गटात एकापेक्षा जास्त शिक्षकांचा समावेश व्हायला हवा. प्रामाणिकपणे काम करणारे जे शिक्षक पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवत नाहीत त्यांचा विचार कोण करणार, असा प्रश्न राहतो. त्यामुळेच शिफारस करण्याची पद्धत असावी. 'पद्म' पुरस्कारांसाठी ज्या पद्धतीने प्रवेशिका मागवल्या जातात, तशाच प्रकारे शिक्षकांच्या नावांची शिफारस, त्यांची छाननी, फेरतपासणी अशा अनेक गोष्टी व्हायला हव्यात. पुरस्कार हा वाटण्याचा भाग होऊ नये. तो निष्ठेने काम करणाऱ्या शिक्षकांना मिळायला हवा. त्यासाठी या पुरस्कारांची व्याख्या काही प्रमाणात बदलण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांवरही अवलंबून राहू नये. कारण तिथेही शेवटी त्यांच्या जवळचा कोण, त्याचेच गोडवे गाण्याचे प्रकार होत असतात. तालुका शिक्षणाधिकाऱ्यांकडून नावे मागवणे किंवा एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून त्यात राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा समावेश करणे, शिक्षणतज्ज्ञांचा समावेश करणे आणि त्या समितीला आलेल्या अर्जांची छाननी करून, अभ्यास करून पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करण्याची पद्धत सुरू व्हायला हवी. राजकीय नेत्यांच्या घोळक्यात वावरत असला म्हणून एखादी व्यक्ती चांगला शिक्षक असेल असे सरकारनेही समजू नये. शिक्षक संघटनेचा पदाधिकारी असला म्हणजेच तो पात्र ठरतो, असेही नाही. किंवा शिक्षण खात्यावर आसुड न ओढणारा आणि शिक्षण खात्याच्या मर्जीत राहणारा शिक्षक असावा, असेही नाही. चांगला शिक्षक कोण तर ज्यांच्या हाताखाली चांगली पिढी घडते आहे, विद्यार्थ्यांचा प्रिय, शाळेच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेला, ज्यांच्या बदलीमुळे शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे डोळे पाणावतात अशा होतकरू शिक्षकांचा सन्मान फार कमी होतो, असेच सध्याचे चित्र आहे. ऋषी वसिष्ठांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार हे 'विशिष्ट' लोकांना दिले जाणारे पुरस्कार ठरू नयेत. शिक्षकांची संख्या लक्षात घेता प्राथमिक, माध्यमिक स्तरावरच पुरस्कारांची संख्या प्रत्येकी किमान पाच असण्याची गरज आहे. सध्या गटात दोन पुरस्कार दिले जातात. पुरस्कार देण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेक चांगले शिक्षक निवृत्त झाले, पण त्यांचा विचार कधी सरकारने केला नाही. भलेही असे चांगले शिक्षक पुरस्काराची आस ठेवत नाहीत, पण म्हणून जे आपले आहेत त्यांनाच पुरस्कार दिले जातील, असा प्रघातही पडू नये. हे पुरस्कार आदर्श शिक्षक म्हणून समाजात नाव कमावलेल्या शिक्षकांना दिले जावेत. ज्यात युवा शिक्षक असतील, वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन त्यांची बुद्धिमत्ता विकसित करणारे शिक्षक असतील, वेगवेगळे उपक्रम राबवून मुलांना स्पर्धेच्या युगाशी सामना करण्यासाठी तयार करणारे शिक्षक असतील, अशा चांगल्या आणि पुरस्काराचा खरा मान ज्यांचा आहे, अशा शिक्षकांची निवड पुरस्कारांसाठी व्हायला हवी. त्यासाठी पुरस्कारासाठी शिफारशी घेण्यापासून ते निवड समितीपर्यंत सारी प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी.