गणेशोत्सवाचा आज पाचवा दिवस आहे. भक्तिभावाने, आनंदाने गणरायाला जे जे प्रिय आहे ते अर्पण करून मंगलमूर्तीची छान सेवा करण्याची संधी या उत्सवाच्या निमित्ताने आम्हा सर्वांना मिळाली. गणपतीला काय काय आवडतं हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. दूर्वा, लाल जास्वंदीचे फूल, मोदक इ. वेगवेगळी पत्री म्हणजेच विविध वनस्पतींची पानं सुद्धा पूजा करताना गणपतीला वाहिली जातात. या पानांपैकीच एक म्हणजे जाति पत्र अर्थात जाईची पाने.
जाईची नाजूक नाजूक सुगंधी फुलं तर तुम्ही पाहिली असतीलंच. जाईच्या सुगंधाने मन प्रफुल्लित होतं ना???
जाईजी वेल असते, पावसाळ्यात या वेलीला सुंदर नाजूक पांढऱ्या व फिकट गुलाबी रंगाच्या कळ्या येतात, ज्या संध्याकाळी फुलतात व त्यांचा मंद सुगंध दरवळू लागतो.
आपल्या गोव्यात तर विविध देवळांमधील जायांची पूजा प्रसिद्ध आहे. मंदिरातील गाभाऱ्यात जाईच्या फुलांची आरास मूर्ति भोवती केली जाते, व जायांच्या हारांनी मूर्ति सजवली जाते.
गणपतीला सुद्धा या सुगंधी जाईचे हार अर्पण केले जातात.
जाईची पाने, फुले आणि मूळ औषधी गुणांनी युक्त आहे.
जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल बनविले जाते.
तुम्हाला माहीत आहे का?? जास्त तिखट, आंबट, खारट पदार्थ चिली सॉस, चिप्स, चमचमीत पदार्थ खाल्ले असता किंवा शरीरातील उष्णता वाढली असता तोंडात जखमा होतात, यालाच तोंड येणे/माऊथ अल्सर असे म्हणतात. जाईची ५-६ पानं चावून, तोंडात फिरवली की तोंडात होणारी जळजळ कमी होते.
वेगवेगळी आयुर्वेद औषधे बनवण्यासाठी जाईची पाने व मूळ वापरतात.
जाईच्या वेलींवरून कळ्या अलगद काढताना मन आनंदित होते. ज्यांना खूप कंटाळा येतो, खूप राग येतो त्यांनी मुद्दाम जाईच्या कळ्या वेलीवरून काढण्याचा अनुभव घ्या.
जाईच्या फुलांचे गजरे मुली व महिला केसात माळतात. सुगंधी जाईच्या गजऱ्यामुळे त्या अजूनंच सुंदर दिसतात. तुमच्या आईला, आजीला किवा ताईला असा गजरा देऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. आणि देवीला अर्पण केलेला मंदिरातील गजरा असेल तर त्यांचा आनंद द्विगुणित होतो.
जाईची फुलं तुम्ही सर्वांनी बघितली असणार, या गणेशोत्सवात जाईच्या पानांची देखील ओळख करून घ्या व या वनस्पतीचे फायदे लक्षात ठेवा.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य