आपणा सर्वांचे आराध्य दैवत, बुद्धीदेवता श्री गणरायाचे आगमन आपल्या सर्वांच्या घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी सुद्धा होणार आहे. तुम्ही सर्वजण श्रीगणेशाच्या स्वागताच्या तयारीत मग्न असाल ना? ही तयारी करत असताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा हं...
पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर:
माती आणि नैसर्गिक रंगांपासून बनवलेल्या मूर्ती वापरा.
सजावटीसाठी नैसर्गिक
गोष्टींचा वापर करा
बऱ्याचदा थर्माकोल, प्लास्टिकचा वापर केला जातो. या गोष्टी नदीत, तलावात टाकल्या असता पाण्याचे प्रदूषण होते. काही जण विसर्जनानंतर या गोष्टी जाळून टाकतात त्यामुळे हवा प्रदूषण होऊन आपल्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे कागद, बांबू, माडाच्या झावळ्या, केळीची पाने, तोरण बनवण्यासाठी फुले, आंब्याची पाने इ. चा वापर सजावटीसाठी करा. या गोष्टी परत निसर्गात विघटित होतात त्यामुळे प्रदूषण टळते.
फटाके अगदी कमी प्रमाणात वापरा
फटाक्यांमध्ये अनेक प्रकारचे रासायनिक पदार्थ असतात, ज्यामुळे वातावरणात धूर, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स आणि इतर हानिकारक गॅसेस सोडले जातात. त्यामुळे वायू प्रदूषणाचा स्तर खूपच वाढतो. श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना फटाक्यांच्या धुरामुळे श्वास घेणे कठीण होते
अनेकदा फटाक्यांच्या आवाजामुळे लहान मुले घाबरतात. वयोवृद्धांना फटाक्यांचा आवाज सहन करणे कठीण जाते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. पक्षी आणि इतर प्राणी फटाक्यांच्या आवाजाने घाबरतात. ध्वनी प्रदूषण होते.
फटाक्यांच्या असुरक्षित व अतिवापरामुळे अनेकदा अपघात होतात. लहान मुलांमध्ये फटाके फोडताना जखमा होणे, डोळ्यांना इजा होणे अशा समस्या घडतात. फटाके फोडताना जर योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
फटाक्यांचा मर्यादित वापर करून आणि पर्यावरणपूरक फटाके वापरून सणाचा आनंद घेतला जाऊ शकतो. समाजातील सर्व वयोगटातील लोकांना या सणाचा आनंद घेता यावा यासाठी फटाक्यांचा वापर सुरक्षित आणि विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. आपला सण आनंदाने साजरा करत असताना पर्यावरणाचे आणि समाजाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे हे आपल्यापैकी प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.
गणेशोत्सव आपल्या आवडत्या गणरायाची भक्ती, सेवा करण्यासाठी, आनंद, एकता, मानसिक शांती व बुद्धी लाभावी यासाठी साजरा करावा. त्यासाठी सर्वांनी एकत्र बसून ' श्री गणेशाय नम:' या मंत्राचे नामस्मरण, गणपती स्तोत्रे, गणपती अथर्वशीर्ष, गणरायाचे भजन व आरती करून मंगलमय वातावरणात उत्सव साजरा केला असता आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर सुद्धा उत्तम परिणाम होणार. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.