मुंगूल-माडेल येथे थरारक घटना : दोन तरुण गंभीर जखमी; दहा बारा जणांचा हल्ला
मुंगूल-माडेल येथे मंगळवारी पहाटे ४.३०च्या सुमारास एक थरारक घटना घडली. पाच ते सहा हल्लेखोरांनी रस्त्यावर गाडी आडवी घालून दोन तरुणांवर दांडा, तलवार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तरुणांनी गाडीचे दरवाजे आतून बंद करून घेतले. मात्र, हल्लेखोरांनी त्यानंतर गाडीवर गोळीबार केला. या हल्ल्यात रफिक ताशान (२४) आणि युवकेश सिंग बहादूर (२०) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी गोमेकॉ (गोवा मेडिकल कॉलेज) येथे दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच फातोर्डा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासामध्ये पोलिसांना बंदुकीच्या वापरलेल्या शेलसह एक जिवंत काडतूस (गोळी) सापडले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू केला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.