सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी वन ग्रामस्थ एकटवले

कडक पोलीस बंदोबस्त : मामलेदार, तलाठ्यांना परत पाठवले


12th August, 12:45 am
सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी वन ग्रामस्थ एकटवले

वन गावात सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना ग्रामस्थ. मोठ्या प्रमाणात तैनात पोलीस बंदोबस्त.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : मये मतदारसंघातील वनमावळींगे कुडचिरे पंचायत क्षेत्रातील वन गावात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डिचोलीचे मामलेदार, तलाठी व टीम पोलीस फाट्यासह काही ठिकाणी घरांच्या सर्वेक्षणासाठी सोमवारी आली होती. ग्रामस्थ तातडीने संघटित झाले व त्यांनी सर्वेक्षणास आलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारून भू सर्वेक्षणास विरोध केेला. अधिकाऱ्यांना तिथून परत पाठवून दिले.
पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता अचानक सर्वेक्षणाच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी अधिकारी आल्याने ग्रामस्थ भांबावले. यावेळी मामलेदार दत्तप्रसाद तोरस्कर यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र ग्रामस्थांनी नोटीस किंवा पूर्वकल्पना न देता सर्वेक्षण कसे करू शकता आदी प्रश्न विचारले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. बराच वेळ चर्चा चालू असताना स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वकिलाची नियुक्ती केली जाईल. याप्रकरणात मी ग्रामस्थांच्या पाठीशी राहीन, अशी आमदार शेट यांनी हमी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. दरम्यान, काँग्रेसचे अजय प्रभूगावकर व गोवा फॉरवर्डचे संतोषकुमार सावंत यांनीही वन गावात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. प्रकरण न्यायप्रविष्ट असून १३ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे......
जमिनीचा प्रश्न पुन्हा एेरणीवर

यापूर्वी मावळींगे कुडचिरे जमिनीच्या प्रश्नावरून अनेक वेळा ग्रामस्थ संघटित झाले आहेत. आता वन गावात टीम पाठवून मामलेदार व तलाठी यांनी सर्वेक्षणाच्या दृष्टीने हालचाल केली असल्यामुळे पुन्हा एकदा येथील जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पूर्वसूचना न देता सर्वेक्षणाबाबत विचारणा करण्यात आल्याने लोक भांबावून गेले. अनेक वर्षे लोक येथे राहत आहेत. त्यामुळेच ग्रामस्थांनी सर्वेक्षणाला विरोध केला.
_ तुळशीदास बुगडे, स्थानिक पंच