काँग्रेस-आरजी युती अखेर तुटली!

'गोवा फॉरवर्ड'सोबत मात्र चर्चा सुरू: माणिकराव ठाकरे

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
काँग्रेस-आरजी युती अखेर तुटली!

पणजी: जागावाटपावर एकमत न झाल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि रिव्होल्युशनरी गोवन्स (RG) यांच्यातील युती आता होणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. युती होणे आता अशक्य असल्याचे गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे. तथापि, 'गोवा फॉरवर्ड' (GF) पक्षासोबत मात्र युती होण्याची शक्यता असून, त्या दिशेने चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद निवडणूक २० डिसेंबर रोजी होणार आहे. आचारसंहिता लागू होऊन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतरही काँग्रेस आणि आरजी यांच्यात युतीची चर्चा अनेक दिवस सुरू होती. शनिवारी काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीच्या नेत्यांमध्ये युतीवर चर्चा झाली होती.

युती का तुटली?

काँग्रेसने आरजीला जो प्रस्ताव दिला होता, तो आरजीने अमान्य केला. सुधारित प्रस्तावही आरजीने स्वीकारला नसल्यामुळे युती तुटल्याची माहिती काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख यांनीही दिली. याबद्दल स्पष्टीकरण देताना प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले की, सांताक्रुझ येथे काँग्रेसचा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहे, ती जागा सोडण्यास आरजी तयार नव्हती. तसेच, काँग्रेस मजबूत असलेल्या जागांवरही आरजीने दावा केला. त्यामुळे युती होऊ शकली नाही.

विजय सरदेसाईंचा भाजपवर निशाणा

युती तुटल्यानंतर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. राज्यात विरोधकांच्या एकजुटीला खिंडार पाडण्याचा भाजपचा प्रयोग यशस्वी झाला आहे, असे सरदेसाई म्हणाले. ते म्हणाले, गोव्याची जनता सुसंस्कृत आणि हुशार आहे. निवडणुकीपर्यंत कोणी हा प्रकार केला आहे आणि कोणाला मत द्यायचे याबद्दलचा निर्णय लोक घेतील व योग्य तो न्याय देतील. युती तुटण्यामागील घडामोडींचा लोकांनीच विचार करावा. गोवा फॉरवर्डचे जिल्हा परिषद उमेदवार कृष्णा परब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी सरदेसाई बोलत होते.

युतीचा आणि नेतृत्वाचा मुद्दा:

सरदेसाई यांनी स्पष्ट केले की, गोमंतकीयांना जो एकवट हवा आहे, तो घडवून आणण्यासाठी आणि लोकांना दाखवण्यासाठी मीच आरजीपीला बरोबर आणण्याचा पुढाकार घेतला होता. भाजप मोठा पक्ष असल्याने त्यांच्याकडे मोठी संसाधने आहेत, ते भावाभावांमध्ये, घराघरात फूट पाडू शकतात. त्यामुळे गोव्यात विरोधकांचा एकवट फोडण्याचा प्रयोग भाजपने यशस्वी केला असला तरी, लोकांनी न्याय करावा.

पुढे ते म्हणाले, "या आघाडीत काँग्रेस हा वरिष्ठ घटक आहे. त्यामुळे आघाडीची घोषणा मी नव्हे, तर काँग्रेसनेच करायची आहे. मी विरोधकांमध्ये वरिष्ठ आमदार असू शकतो, एक चांगला मागणी करणारा असू शकतो, पण मी आघाडीचा वरिष्ठ घटक नाही."

पक्षांतर करणाऱ्यांना आश्रय नाही :

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या पक्ष फुटीरांना गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे पडद्याआड प्रवेश दिला जात असल्याच्या आरजीपीच्या आरोपाला उत्तर देताना सरदेसाई म्हणाले की, प्रादेशिक पक्षाची भूमिका पक्ष फुटीरांना व्यासपीठ देऊ नये, या आरजीच्या मताचे मी समर्थन करतो. परंतु, पक्ष फुटीरांची व्याख्या काय आहे, याचा खोलवर विचार व्हायला हवा. आम्ही कुठल्याही फुटीराला व्यासपीठ देत नाही. त्यामुळे पक्ष फुटीरांची व्याख्या नीट ठरवा, असा सल्ला सरदेसाई यांनी दिला.

हेही वाचा