बॅली डान्सदरम्यान वापरलेल्या 'पायरो गन'ने पेटवले छत; लग्नसमारंभात त्यांचा वापर किती सुरक्षित? वाचा सविस्तर

पणजी: गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाइटक्लबमधील भीषण आगीच्या दुर्घटनेचे (Goa Fire Tragedy) नेमके कारण आता समोर आले असून, 'कोल्ड पायरो गन्स' (Cold Pyro Guns) नावाच्या इलेक्ट्रिक फटाक्यांमुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेने विवाह समारंभ आणि पार्ट्यांमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या या उपकरणांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

'पायरो गन्स'मुळे लागली होती आग:
सुरुवातीला सिलिंडर स्फोटाने आग लागल्याचा अंदाज होता, परंतु प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रात्री ११:४५ च्या सुमारास क्लबमध्ये बॅली डान्सचा परफॉर्मन्स सुरू असताना ही घटना घडली. परफॉर्मरने वापरलेल्या 'कोल्ड पायरो स्टिक्स'मधून निघालेल्या ठिणग्या थेट बांबू, फायबर आणि गवतासारख्या ज्वलनशील वस्तू वापरून बनवलेल्या छताला लागल्या. ठिणग्या छताला लागताच काही मिनिटांत आग वेगाने पसरली आणि संपूर्ण क्लबमध्ये धुराचे लोट पसरले. या दुर्घटनेवेळी क्लबमध्ये सुमारे २०० लोक उपस्थित होते.
सुरक्षेचे नियम मोडले, २५ निष्पाप बळी:
क्लबचे बांधकाम तात्पुरते स्वरूपाचे आणि पामच्या पानांनी (झावळ्या) केलेले होते. या तात्पुरत्या बांधकामामुळे आग इतक्या वेगाने पसरली आणि अरुंद मार्ग, अपुऱ्या सुरक्षेमुळे क्लब मृत्यूचा सापळा बनला. स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्लबला स्थानिक पंचायतीने कोणतेही परवाने दिले नव्हते, उलट पाडकामाची नोटीस बजावली होती.
क्लबच्या ठिकाणी अरुंद रस्ते असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळापासून सुमारे ४०० मीटर दूर उभ्या कराव्या लागल्या, ज्यामुळे आग विझवण्याच्या प्रयत्नांना विलंब झाला.
'कोल्ड पायरो गन्स'चा सुरक्षित वापर आवश्यक:
'कोल्ड पायरो गन्स'मुळे धूर आणि वास कमी येतो, म्हणून ते समारंभात वापरले जातात. परंतु, हे उपकरण वापरताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. अमेरिकेची व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य प्रशासन (OSHA) या संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फटाक्यांच्या किंवा पायरोटेक्निक साहित्याच्या ५० फुटांपर्यंत स्मोकिंग मटेरियल, माचिस किंवा खुली आग नेण्यास सक्त मनाई आहे. या उपकरणांचा वापर नेहमी मोकळ्या जागेत आणि ज्वलनशील वस्तूंपासून दूर करण्याची शिफारस केली जाते.
दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती:
या भीषण दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी गोवा सरकारने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा, फोरेन्सिक सायन्स संचालक आशुतोष आपटे आणि अग्निशमन व आपत्कालीन सेवेचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर यांचा समावेश आहे. ही समिती दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास करेल.

१९ मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण
हडफडे दुर्घटनेत दगावलेल्या २५ पैकी १९ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पैकी १६ मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहेत. तर जखमी झालेल्या ५ व्यक्तींपैकी अतिश मेहता याला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. उर्वरित जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे आरोग्य सचिव यतींद्र मराळकर.
