दारूच्या नशेत साऊंड सिस्टीम फोडली; पोलिसांचा लाठीचार्ज. अनेकांना घेतले ताब्यात

पणजी: पणजी: गोव्यातील पिलार येथील फादर एग्नेल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या झाारखंडी समुदायाच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाला आयोजकांच्या गैरकृत्यामुळे मोठे गालबोट लागले. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या लोकांकडून मैदानावर तोडफोड आणि गोंधळ झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली, अखेरीस पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवले आणि अनेक लोकांना ताब्यात घेतले.
गोंधळाचे कारण
कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांनी प्रवेश शुल्क म्हणून ३०० ते ३५० रुपये मोजले होते, मात्र मैदानावर कार्यक्रम सुरू झाला नाही आणि आयोजकही गैरहजर राहिले. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने गोंधळ सुरू केला. दारूच्या नशेत असलेल्या काही लोकांनी मैदानावर तोडफोड सुरू केली.
लाखोंचे नुकसान आणि आयोजक पसार
संतप्त जमावाने स्टेजची तोडफोड केली, सुमारे १० ते ११ लाख रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम पूर्णपणे फोडून टाकले. याशिवाय, सेट-अप फाडून टाकण्यात आला आणि काही ठिकाणी आग लावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. गोंधळ वाढताच कार्यक्रमाचे आयोजक पैसे घेऊन घटनास्थळावरून पसार झाले असल्याची माहिती येथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी दिली आहे.
परिस्थिती अतिशय तणावपूर्ण बनल्याने पोलिसांचे मोठे पथक तातडीने मैदानावर दाखल झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. धक्कादायक बाब म्हणजे, संतप्त जमावाने बाजूलाच असलेल्या शाळेवर दगडफेक केली आहे. व्यवस्थापन आणि सुरक्षिततेमधील मोठ्या चुकीमुळे ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले असून, आयोजकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
बातमी अपडेट होत आहे.