अग्निशमन दलाच्या जवानांनी केली पाहणी

पणजी: येथील कला अकादमीच्या आवारात 'सेरेंडिपीटी कला महोत्सवा'साठी (Serendipity Arts Festival) उभारलेल्या सजावटीच्या साहित्याला आज ४.४५च्या सुमारास आग लागल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रसंगावधान राखून आग केवळ चार ते पाच मिनिटांतच आटोक्यात आणण्यात यश आले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि सजावटीचे काम करणाऱ्या कामगारांनी तत्काळ धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवानही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
आगीचे कारण स्पष्ट:
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले. सजावटीचे काम सुरू असताना वेल्डिंगची ठिणगी ज्वलनशील साहित्यावर पडल्याने हा भडका उडाला होता, असे जवानांनी सांगितले. मोठी दुर्घटना टळल्याने कला अकादमीच्या मुख्य सांस्कृतिक स्थळाजवळ निर्माण झालेला तणाव कमी झाला आहे.
कालच रविवारी पहाटे हडफडे येथील क्लबमध्ये दुर्घटनेत सुमारे २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याघटनेतून गोवा अजूनही सावरलेला नाही. अशातच ही घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
