४ व्यवस्थापकांना ६ दिवसांची पोलीस कोठडी; आज एकाला अटक,

पणजी: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) या नाइटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने आता गोव्यात मोठे राजकीय आणि प्रशासकीय वादळ निर्माण केले आहे. याची धग आता दिल्लीत पोहोचल्याचे दिसत आहे. या क्लबचे मालक असलेले 'गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअर-कम-रेस्टॉरंट व्यावसायिक' सौरभ लुथरा आणि त्यांचा भाऊ गौरव लुथरा यांच्याविरोधात गोवा पोलिसांनी 'लूक आऊट' (Look Out) नोटीस जारी केली असून, दोघेही देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

क्लब मालक सौरव लुथरा कोण आहेत?
'रोमिओ लेन' या रेस्टॉरंट चेनचे अध्यक्ष असलेले सौरभ लुथरा हे मूळचे दिल्लीचे रहिवासी आहेत. ते एक गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअर आहेत, पण त्यांनी फूड अँड बेवरेज (F&B) उद्योगात पाऊल ठेवले. त्यांच्या कंपनीच्या वेबसाइटनुसार, त्यांचे 'रोमिओ लेन' हे ब्रँड सध्या २२ शहरे आणि ४ देशांमध्ये कार्यरत आहे. २०२३ मध्ये 'टाइम्स हॉस्पिटॅलिटी आइकॉन्स'ने त्यांना 'आयकोनिक रेस्टॉरंट व्यावसायिक' म्हणून सन्मानित केले होते. या क्लबच्या मालकीवरून त्यांचा भागीदारासोबत वाद सुरू होता, अशी माहिती सरपंच रोशन रेडकर यांनी दिली होती. क्लबचे बांधकाम बेकायदा असल्यामुळे पंचायतीने पाडण्याचा आदेश दिला होता, पण लुथरा यांनी न्यायालयाकडून स्थगिती मिळवली होती.

३६ तासांतील घटनाक्रम आणि कारवाई
* रविवार (७ डिसेंबर) पहाटे १:०० वाजता ही दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई सुरू केली:
* २५ बळी आणि आगीचे कारण: दुर्घटनेत क्लबचे कर्मचारी आणि पर्यटक मिळून २५ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जखमी झाले. बहुतांश मृत्यू गुदमरल्यामुळे झाले. सुरुवातीला सिलिंडर स्फोटामुळे आग लागल्याचा अंदाज होता, परंतु प्रत्यक्षदर्शींनी डान्स परफॉरमन्सदरम्यान वापरलेल्या कोल्ड पायरो गनमधून (Cold Pyro Guns) निघालेल्या ठिणग्या छताला लागल्यामुळे आग भडकली आणि नंतर ती वाढल्याची माहिती दिली.

* ५ जणांना अटक: हणजूण पोलिसांनी क्लब व्यवस्थापनातील राजीव मोडक (चीफ जनरल मॅनेजर), प्रियांशू ठाकूर (गेट मॅनेजर), राजवीर सिंघानिया (बार मॅनेजर) आणि विवेक सिंग (जनरल मॅनेजर) या चौघांना तात्काळ अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज सकाळी करण सिंग कोहली (४९) यालाही अटक केली आहे. याशिवाय, क्लबचे दैनंदिन कामकाज पाहणारा दिल्लीतील रहिवासी भरत याला दिल्लीतून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

* लूक आऊट नोटीस: गोवा पोलिसांनी क्लब मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्याविरोधात 'लूक आऊट' नोटीस जारी केली आहे. दोघेही देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याने सर्व विमानतळ आणि पोलीस स्थानकांना सतर्क करण्यात आले आहे.

* प्रशासकीय कारवाई: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी क्लबमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे मान्य करत दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी विविध परवाने आणि परवानगी देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवरही तपास सुरू करण्यात आला आहे. तत्काळ कारवाई करत संचालक (मत्स्यव्यवसाय) आणि तत्कालीन सदस्य सचिव, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, डॉ. शमीला मॉन्टेरो यांना निलंबित करून त्यांची बदली करण्यात आली आहे.

* मालकाची प्रतिक्रिया: फरार असलेले मालक सौरभ लुथरा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या भीषण घटनेचे पडसाद गोव्याच्या पर्यटन आणि प्रशासन व्यवस्थेवर तीव्रतेने उमटत आहेत.