शारीरिक चाचणीनंतर दुसरी सीबीटी परीक्षा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) भरती प्रक्रियेत सीबीटी (संगणक आधारित) परीक्षेनंतर होणाऱ्या शारीरिक चाचणीसाठी २,८०५ उमेदवारांची निवड होईल. शारीरिक चाचणीनंतर दुसरी सीबीटी परीक्षा होईल. पीएसआयच्या रिक्त जागांच्या पंधरापट उमेदवारांची निवड शारीरिक चाचणीसाठी केली जाईल, अशी माहिती कर्मचारी भरती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पोलीस खात्यातील पोलीस उपनिरीक्षकांच्या १८७ पदांसाठी रविवारी पहिली सीबीटी झाली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. गुणांवर आधारित शारीरिक चाचणीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. १८७ पैकी ३० पदे महिलांसाठी, तर पुरुषांसाठी १५७ पदे आहेत. शारीरिक चाचणीसाठी २,३५५ पुरुष आणि ४५० महिला उमेदवारांची निवड होईल. पुरुषांसाठीच्या पदांपैकी एससीसाठी ३, एसटीसाठी १९, ओबीसीसाठी ४१ आणि ईडब्ल्यूएससाठी १४ पदे राखीव आहेत. शारीरिक चाचणीसाठी एससी गटातून ४५, एसटीमधून २८५, ओबीसी गटातून ६१५, तर ईडब्ल्यूएस गटातून २१० उमेदवारांची निवड होईल.
पीएसआयची पदे भरण्यासाठी आयोगाने २ मे रोजी जाहिरात दिली होती. अर्जांच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांसाठी रविवारी पहिली सीबीटी झाली. उत्तर गोव्यातील आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आसगाव) आणि सेंट झेवियर महाविद्यालय, म्हापसा येथे परीक्षा झाली. दक्षिण गोव्यातील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय (फातोर्डा), रोझरी महाविद्यालय (नावेली) आणि एनआयटी (कुंकळ्ळी) या केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
महिला खेळाडूंसाठी ३ पदे राखीव
महिलांसाठी राखीव असलेल्या ३० पैकी ३ पदे खेळाडूंसाठी राखीव आहेत. एसटीसाठी ३, एससीसाठी १, ओबीसीसाठी ९, तर ईडब्ल्यूएससाठी ३ पदे राखीव आहेत. यातही पदांच्या संख्येच्या १५ पट महिला उमेदवारांची निवड शारीरिक चाचणीसाठी केली जाईल.