स्थानिक स्वराज संस्थांमधील फलक मराठीतही लावा

मराठी भाषिकांची मागणी : बेळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर


12th August, 12:38 am
स्थानिक स्वराज संस्थांमधील फलक मराठीतही लावा

निवेदन स्वीकारताना जिल्हधिकारी रोशन, पोलीस आयुक्त बोरसे व समितीचे नेते. (लुईस रॉड्रिग्ज)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
बेळगाव : भाषिक अल्पसंख्यांकांचे अधिकार पायदळी न तुडवता कन्नडसक्ती मागे घेऊन बेळगाव शहरासह खानापूर, निपाणी आणि अथणी येथील स्थानिक स्वराज संस्थांमधील काढून टाकलेले कन्नडसह मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेले नामफलक ताबडतोब पूर्ववत बसवावेत, सरकारी परिपत्रके कन्नडसह मराठी भाषेत द्यावीत आदी मागण्यांचे निवेदन मराठी भाषिकांच्या उपस्थितीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
अलीकडे सुरू असलेल्या कन्नडसक्तीला विरोध दर्शविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारून मोर्चाऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा सल्ला दिला. त्याचा आदर राखून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठ्या संख्येने जमलेल्या मराठी भाषिकांनी मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर केले.
निवेदन सादर करण्यापूर्वी माजी आमदार मनोहर किनेकर यांनी निवेदनातील मागण्यांची जिल्हाधिकाऱ्यांना थोडक्यात माहिती दिली. जमिनीचे उतारे, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, दाखले आणि सरकारी परिपत्रके कन्नडसोबत मराठीमध्ये उपलब्ध करून द्या, सरकारी योजनांची माहिती मराठीत उपलब्ध करा आदी मागण्यांचे फलक लक्ष वेधून घेत होते.यावेळी उपस्थितांनी विविध घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मागण्यांसंदर्भात निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे उपस्थित होते.