दिल्लीत जोरदार निदर्शने : राहुल गांधींसह अनेक नेते ताब्यात
नवी दिल्ली : मतदार यादीतील अनियमिततेवरून आणि ‘मत चोरीच्या’ आरोपांवरून ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी सोमवारी दिल्लीत जोरदार निदर्शने केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ३०० हून अधिक खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अडवत राहुल गांधी, संजय राऊत, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले.
सध्या देशात मत चोरीच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. ‘एसआयआर’ आणि ‘मत चोरीच्या’ आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चादरम्यान इंडिया आघाडीतील नेत्यांनी आणि खासदारांनी 'निवडणूक आयोग चोर आहे', 'मत चोरी थांबवा', 'लोकशाही वाचवा' अशा घोषणा देत सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नसल्याचे कारण देत मोर्चा मध्येच अडवला. राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवर चढून जाण्याचा प्रयत्न केला.
खासदारांना ताब्यात घेऊन सोडले
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, या मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतली गेली नाही म्हणून खासदारांना मोर्चा पुढे नेण्यास रोखण्यात आले. या मोर्चादरम्यान पोलिसांनी राहुल गांधी, संजय राऊत, प्रियांका गांधीसह अनेक खासदारांना ताब्यात घेतले. या सर्वांना पोलिसांच्या व्हॅन आणि बसमध्ये बसवून संसद भवनामध्ये नेऊन सोडण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देखील नेत्यांनी आणि खासदारांनी घोषणाबाजी करणे सुरूच ठेवले.
उत्तर प्रदेशात मतांची लूट : अखिलेश यादव
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही या मोर्चात भाग घेतला होता. त्यांचे म्हणणे आहे की निवडणूक आयोगावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. जर तक्रार असेल तर निवडणूक आयोगाने कारवाई करायला हवी. विशेषतः उत्तर प्रदेशात जिथे मतांची लूट होत आहे. संसदेत आम्हाला आमचे मुद्दे मांडायचे आहेत, पण सरकार ते ऐकण्यास तयार नाही. दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे अखिलेश म्हणाले.
निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमध्ये वाद
- निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांच्या ३० प्रतिनिधींना सोमवारी चर्चेसाठी बोलावले होते.
- दुपारी १२ वा. होणाऱ्या या बैठकीसाठी काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र पाठवून ३० सदस्यांची नावे मागितली होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला.
- विरोधी पक्षांनी म्हटले की, त्यांनी शिष्टमंडळ म्हणून नव्हे, तर एकत्रित निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यामुळे, ‘आम्ही सर्वजण एकत्र जाऊ, नाहीतर कोणीही जाणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी घेतली.
- जागेच्या कमतरतेमुळे केवळ ३० जणांनाच भेटता येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्यामुळे हा वाद निर्माण झाला.
खरे सांगायचे तर ते बोलू शकत नाहीत. सत्य देशासमोर आहे. ही लढाई राजकीय नाही. ही लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे. ही लढाई एक माणूस, एक मत यासाठी आहे. आम्हाला स्वच्छ, शुद्ध मतदार यादी हवी आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते
हे सरकार घाबरलेले : प्रियांका गांधी
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. आमचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. हे सरकार भेकड आहे. घाबरलेले आहे, त्यामुळेच ते असे सर्व प्रकार करत आहेत, असे म्हणत काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी सरकारवर हल्ला चढवला.