"तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे." सुरुवातीला आश्रमशाळेत यायचाही कंटाळा करणारा बाबा आता आश्रमशाळेचं कौतुक करताना थकत नव्हता.
“पण मला सांगा, एकच शिक्षक, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळे वर्ग नाहीत, निवासी शाळा असूनही कोणी मदतनीस नाही – या सगळ्याचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत नाही का?” बाबाने मुलांच्या काळजीपोटी विचारलं.
“आम्ही मुद्दामहून एक शिक्षकी शाळा चालवतोय असं नाही. शाळेची इमारत अपुरी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढवू शकत नाही. आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढत नाही तोपर्यंत शिक्षकांची संख्या वाढू शकत नाही. प्रश्न असा आहे की, तोपर्यंत आम्ही काय करावं? रडत बसावं की नेटाने पुढे जावं? आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय!
“पहिली-दुसरीची मुलं जेव्हा शाळेत येतात, तेव्हा सर्वात आधी आम्ही त्यांना वाचायला शिकवतो. मुलांना स्वतःहून वाचता येणं, आणि वाचलेल्या धड्याचा अर्थ समजणं – ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.
आमचा अनुभव सांगतो की, एकदा का मुलांना वाचण्याची आवड लागली, की मग त्यांना फारसं शिकवावं लागत नाही. ती स्वतःच शिकतात.
आणि ही वाचायला शिकवायची जबाबदारी महाडिक मॅडम घेतात!”
“गावच्या वाचनालयातल्या?”
“हो. रोज दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर त्या, पहिली-दुसरीच्या मुलांना स्वतःसोबत वाचनालयात घेऊन जातात. त्यांना जे आवडेल, जे रुचेल ते वाचू देतात, वाचून दाखवतात. एकदा का मुलं वाचायला लागली की मग वाचतच सुटतात.
आमचा विनीत, ६ वर्षांचा आहे, पण थोडं थोडं जर्मन बोलतो.आणि त्याच्यामुळे आम्ही सुद्धा बोलतो.”
“काय? जर्मन?” आई-बाबा दोघंही दचकून एकदम म्हणाले.
“हो ना! अहो, मजेशीरच आहे हा किस्सा. वर्षभरापूर्वी विनीत इथे आला तेव्हा कुणाशीच बोलायचा नाही. गप्पगप्प, एकटा एकटा राहायचा. आम्ही सगळेच प्रयत्न करत होतो. बिचाऱ्या महाडिक मॅडम सुद्धा नाना प्रयत्न करत होत्या.
अनेक प्रकारची, वेगवेगळ्या लेखकांची, गोष्टींची, कवितांची, कितीतरी पुस्तकं त्याला दाखवत, ऐकवत होत्या. त्याला घरच्यांची आठवण येत असेल म्हणून ‘आई-बाबा आणि मुलगा’ अशा कौटुंबिक गोष्टी वाचून दाखवल्या. शेताची आठवण येत असेल म्हणून शेताचं आणि निसर्गाचं वर्णन असलेल्या गोष्टी वाचून दाखवल्या. पण छे! हा कशातच रमेना. शेवटी त्यानेच एक पुस्तक निवडलं – कोणतं माहीत आहे? चिमुकल्या चेटकीणीचं! एका जर्मन लेखकाच्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद होता तो - The Little Witch! आमच्या मॅडमनी ते पुस्तक मराठीत वाचून दाखवलं. विनीतला ते इतकं आवडलं की त्याने त्याची पारायणं करायला लावली! प्रत्येक वेळी गोष्ट वाचताना, मॅडम लेखकाचं नाव सांगायच्या –‘ऑटफ्रीड प्रॉयस्लर’!
हे नाव ऐकून विनीतची उत्सुकता चाळवली. "हे नाव असं विचित्र का आहे?" असं त्याने विचारल्यावर मॅडमनी त्याला, तो जर्मन लेखक आहे, जर्मनी नावाचा भारता सारखाच दुसरा एक देश आहे, जगात असे अनेक देश आहेत, वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात वगैरे सांगितलं. तेव्हापासून हा विनीत 'मला जर्मन भाषा शिकायची आहे' असा हट्टच धरून बसला. आमची पंचाईत! मग कुठून कुठून पुस्तकं शोधली, इन्टरनेटवर फुकट उपलब्ध असलेले व्हिडिओ शोधले आणि सुरु झाली आमची जर्मन बाराखडी!
"बाराखडी नाही - दास तोयचर अल्फाबेत!" विनीतबरोबर सगळी मुलं एका सुरात ओरडली.
हे पण काहीतरी जादूचे प्रयोगच असावेत असं वाटलं पृथाला...
"दास तोयचर अल्फाबेत असं म्हटल्याने काय होईल? ती चिमुकली चेटकीण इकडे तर येणार नाही ना?" पृथाने घाबरून विचारलं.
"पृथा, ही भाषा त्या चेटकीणीचीच आहे." छोटू दादाने मुद्दाम पृथाला घाबरवलं. "आमच्या विनीतला येते तिची भाषा!"
विनीत पृथापेक्षा एक-दोन वर्षांनीच मोठा होता. एवढ्याशा दादाला चक्क चेटकीणीची भाषा येते याचं पृथाला फार अप्रूप वाटलं.
“मला शिकवशील?” पृथाने लाडीगोडी लावून विचारलं.
“आता नाही हं! खूप उशीर झालाय. तू उद्या परत ये इथे आजोबांबरोबर. पण आता निघायला हवं.” पृथाच्या आईने घाई केली.
सगळ्यांनी मुलांचा, पवार सरांचा निरोप घेतला. पृथा शाळेच्या गेटमधून बाहेर पडली, तेवढ्यात विनीत मागून जोरात ओरडला –
“पृथा, कॉमेन सी दोख वीदर... उद्या पुन्हा ये!”
डाॅ. गौरी प्रभू
९०८२९०५०४५