वाढदिवस साजरा करताना सर्वात महत्त्वाची आणि आपल्या आवडीची गोष्ट म्हणजे केक. केकशिवाय वाढदिवस साजरा केला असं वाटतंच नाही. वेगवेगळ्या आकारातले आणि वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचे केक खाण्यात किती मज्जा येते ना....त्यात चॉकलेट केक तर बऱ्याच जणांचा फेवरेट फ्लेवर. हा केक वर्षातून एक- दोनदा खाल्ला तर ठीक. पण सारखं सारखं प्रत्येक महिन्यात २- ३ मित्र- मैत्रिणींचे, नातेवाईकांचे वाढदिवस साजरा करून आपण प्रत्येक वाढदिवसाला १-१ केकचा तुकडा जरी खात राहिलो तर त्यामुळे आपल्याला त्रास सुद्धा होऊ शकतो. आता तुम्ही विचार करत असाल केक खाऊन त्रास कसा बरं होत असेल???
आज आपण हे समजूया.
बाजारात मिळणारे केक हे सहसा मैद्यापासून बनवलेले असतात.
केक वरचं क्रीम आणि आयसिंग बनवण्यासाठी भरपूर साखर वापरली जाते.
केक डेकोरेट करण्यासाठी कधी कधी तर कृत्रिम खाद्य रंग म्हणजेच फूड कलर आणि कृत्रिम फ्लेवर वापरले जातात आणि प्रिझर्वेटिव्हज् सुद्धा.
मग ह्या सगळ्या गोष्टी सतत व अति प्रमाणात खाल्ल्या तर शरीराला त्रास होऊ शकतो. जास्त गोड पदार्थ खाल्ले की पोटात दुखतं की नाही??? पोटात जंत होऊ शकतात, अजीर्ण होऊ शकते आणि हो वजन सुद्धा वाढू शकतं म्हणजेच आपण लठ्ठ होऊ शकतो. कारण आत्ता आपण पूर्वीसारखे मैदानी खेळ खेळत नाही. घरी आलो की एका जागी बसून अभ्यास करतो आणि अभ्यास झाला की सोफ्यावर लोळत मोबाईलवर गेम खेळत बसतो किंवा रील्स बघत बसतो. या सवयी सुद्धा आरोग्यासाठी चांगल्या नाहीत.
गोड पदार्थ रोज रोज खात असाल आणि व्यायाम करत नसाल मैदानी खेळ खेळत नसाल तर गोड पदार्थ सहज पचत नाहीत. आणि त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.
लठ्ठपणा आला की आळस वाढतो, अभ्यास होत नाही, तसेच इतर वेगवेगळे आजार होण्याची शक्यता वाढते.
मग आता वाढदिवसाला करायचं तरी काय?? केक तर पाहिजेच. काय करायचं माहिती आहे? हेल्दी आणि चविष्ट केकचे प्रकार निवडायचे. बाजारातील केक न आणता घरीच केक करायचा.
मैद्या ऐवजी रवा, गव्हाचे पीठ, नाचणीचे पीठ, असे पदार्थ वापरू शकतो.
केकचे अनेक हेल्दी पर्याय बनवता येतात जसे की रवा व गाजर घालून बनवलेला कॅरट केक, खजूर अक्रोड रवा आणि गव्हाचे पीठ घालून बनवलेला डेट्स अँड वॉल नट केक, साजूक तुपात बनवलेला रवा केक. ...त्याशिवाय आपल्याकडे वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या फ्लेवरचे हेल्दी केक बनवू शकतो जसे की पावसाळ्यात काकडी / तसं घालून तवसळीचा केक, उन्हाळ्यात जाड रवा व फणसापासून जॅकफ्रूट केक (धोणस) किंवा आंबा घालून मॅंगो केक करू शकतो.
आणि अगदी सोपा केक म्हणजेच फ्रुट केक. वेगवेगळ्या प्रकारची चविष्ट ताजी फळं, वेगवेगळ्या आकारात कापून आपण केकची रचना करू शकतो.
या सगळ्या घरी केल्या जाणाऱ्या केकमध्ये साखरे ऐवजी गूळ वापरू शकतो किंवा खजूर सुद्धा वापरू शकतो.
असे केक कृत्रिम रंग आणि फ्लेवर्स नसल्यामुळे थोडेसे जास्त खाल्ले तरी त्याचा शरीराला त्रास होणार नाही. त्याशिवाय त्या त्या ऋतूतील फळांचे आरोग्यदायी फायदे सुद्धा मिळतील.
त्याशिवाय कायम चॉकलेट केक न खाता आपल्याला वेगवेगळे फ्लेवर सुद्धा चाखता येतील आहे की नाही मज्जा??? चला तर मग असे वेगवेगळे केकचे फ्लेवर आईला - आजीला करायला सांगा आणि मित्र मैत्रिणींना सरप्राईज द्या.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य