‘सलाकार’ ते ‘स्टोलन’ ओटीटीवर भरगच्च मनोरंजन

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
08th August, 12:35 am
‘सलाकार’ ते ‘स्टोलन’ ओटीटीवर भरगच्च मनोरंजन


शुक्रवारी, ८ ऑगस्ट रोजी, विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही बहुप्रतिक्षित वेबसीरिज व चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी५, नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार आणि लायन्सगेट प्ले या प्लॅटफॉर्मवर थरार, प्रेमकथा, कौटुंबिक नाट्य आणि सत्य घटनांवर आधारित डॉक्युमेंट्री अशा विविध प्रकारातील कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत


अरेबिया कडली । अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
सत्य देव, आनंदी अभिनित अरेबिया कडली हा तेलुगू चित्रपट आंध्र प्रदेशातील एका मच्छीमार गावातील मच्छीमारांवर आधारीत आहे. ते चुकून आंतरराष्ट्रीय समुद्रसीमेपलीकडे जातात आणि परदेशी कारावासात अडकतात. तिथे जगण्यासाठी त्यांना नवे मित्र तयार करावे लागतात आणि शत्रूंचा सामना करत सुटकेचा मार्ग शोधावा लागतो.

ओहो इथन बेबी। नेटफ्लिक्स

मिथिला पालकर, रुद्र, विष्णू विशाल अभिनित या तमिळ चित्रपटाची कथा एका हताश फिल्ममेकरवर आधारीत आहे. जो आपल्या प्रेमभंगावर एक सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतो. पण या प्रवासात तो आपलीच कथा आणि वास्तव यांच्यातील सीमारेषा तपासू लागतो.


मोथेवारी लव्ह स्टोरी । झी५
अनिल गीला, वर्षिनी रेड्डी जुनुथुला अभिनित या चित्रपटात तेलंगणातील ग्रामीण भागातील परशी आणि अनिथा हे दोघे पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण त्यांच्या कुटुंबातील एक धक्कादायक रहस्य त्यांच्या प्रेमकथेची दिशा बदलून टाकते. त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबांमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी पुन्हा यावे लागते.


प्रिटी थिंग । लायन्सगेट प्ले
अ‍ॅलिसिया सिल्व्हरस्टोन, कार्ल ग्लुसमन अभिनित ही एक इरॉटिक थ्रिलर सिरीज आहे. जिथे सोफी ही एक यशस्वी आणि सिंगल बिझनेसवुमन एलियट नावाच्या तरुणाशी शारीरिक संबंध ठेवते. मात्र नाते संपवायचे ठरवल्यानंतर एलियटचा प्रेमभाव अतिरेकी बनतो आणि गोष्टी हाताबाहेर जातात.


सलाकार । जिओहॉटस्टार
नवीन कस्तुरिया, मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘सलाकार’ ही एक जबरदस्त गुप्तहेर थरारक मालिका आहे. ज्यात अधिकारी अधीर पाकिस्तानकडून होणारा अणुहल्ला टाळण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र काही वर्षांनंतर त्याचे जुने शत्रू पुन्हा त्याच्या आयुष्यात परततात आणि त्याला वैयक्तिक आयुष्य आणि देशसेवा यामधून निवड करावी लागते.


स्टोलन: हाइस्ट ऑफ द सेंच्युरी । नेटफ्लिक्स
ही एक सत्यघटनेवर आधारित डॉक्युमेंट्री आहे जी २००३ मधील जगातील सर्वात मोठ्या हिरे चोरींपैकी एक असलेल्या घटनेवर ही डॉक्युमेंट्री आधारीत आहे.


मामन । झी५
सूरी, राजकिरण, ऐश्वर्या लक्ष्मी, स्वासिका यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट इनबा नावाचा नवविवाहित युवक आणि त्याचा लाडका भाचा लाडू यांच्यातील नाते दाखवणारा कौटुंबिक चित्रपट आहे. इनबाचे लाडूवरचे प्रेम त्याच्या वैवाहिक नात्यावर परिणाम करते आणि नात्यांमधील गुंतागुंत उभी राहते.