चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. 'आर्या' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका थरारक स्टंटचे प्रात्यक्षिक करताना सुप्रसिद्ध स्टंट आर्टिस्ट एस. एम. राजू यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी, १३ जुलै रोजी सकाळी घडली. कार स्टंट करताना वाहनावरील ताबा सुटल्याने ते गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती अभिनेता विशाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली. त्यांनी लिहिले की, राजु आज आमच्यात नाही, ही गोष्ट पचवणे अत्यंत कठीण आहे. स्टंट आर्टिस्ट राजू यांचा 'आर्या' चित्रपटाच्या सेटवर एक स्टंट सीन करताना मृत्यू झाला. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांनी माझ्या चित्रपटांमध्ये अनेक धाडसी स्टंट केले आहेत. ते खरेच अत्यंत शूर होते.
विशाल यांनी राजू यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत त्यांना संपूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. मी त्यांच्या कुटुंबासाठी सदैव उपलब्ध राहीन. आपण सर्व एकाच चित्रपटसृष्टीचा भाग आहोत. त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेत मी माझे कर्तव्य समजून त्यांच्या कुटुंबासाठी उभा राहीन, असे भावूक उद्गार त्यांनी काढले.
या घटनेमुळे तमिळ चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रसिद्ध स्टंट कोरिओग्राफर स्टंट सिल्वा यांनीही राजू यांना श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, एस.एम. राजू हे आमच्या स्टंट युनिटमधील सर्वोत्तम स्टंटमनपैकी एक होते. त्यांची उणीव भारतीय चित्रपटसृष्टीला नेहमी जाणवेल. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि चाहत्यांनीही सोशल मीडियावरून राजू यांना श्रद्धांजली अर्पण केली.