जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहे. ‘स्पेशल ऑप्स २’सारख्या बहुप्रतीक्षित वेब सीरिजपासून ते ‘आप जैसा कोई’सारख्या फ्रेश रोमँटिक ड्रामापर्यंत, ओटीटी प्रेमींना या आठवड्यात घरीच मनोरंजनाचा झरा वाहणार आहे.
मूनवॉक । जिओ सिनेमा
मल्याळम भाषेतील हा फ्रेश आणि टीनएज थीमवर आधारित चित्रपट ‘मूनवॉक’ प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. तारुण्यातील मैत्री, भावनात्मक गुंतागुंत आणि जीवनातील दिशा शोधण्याचा प्रवास याची कथा आहे. विनोद ए. के. यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची ओटीटीवर एन्ट्री झाली आहे.
झियाम । नेटफ्लिक्स
झोंबी अॅक्शन फॅन्ससाठी खास ठरणारा ‘झियाम’ हा थरारक अॅक्शनपट, थायलंडचा सुपरस्टार मार्क प्रिन सुपारत यांच्या भूमिकेमुळे आधीच चर्चेत आहे. जीवघेण्या जागतिक संकटात अडकलेला माणूस आणि झोंबी यांच्यातील संघर्षाची ही झपाटणारी कहाणी आहे.
बॅलार्ड । प्राइम व्हिडीओ
एलएपीडी डिटेक्टिव्ह रेनी बॅलार्डच्या गुंतागुंतीच्या तपासावर आधारित ही हॉलीवूड सीरिज खिळवून ठेवणारी आहे. मॅगी क्यूने साकारलेली प्रमुख भूमिका आणि रहस्यकथेची जबरदस्त मांडणी ही या सीरिजची जमेची बाजू आहे.
आप जैसा कोई । नेटफ्लिक्स
आर. माधवन आणि फातिमा सना शेख ही फ्रेश जोडी ‘आप जैसा कोई’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेम, नात्यांमधली गुंतागुंत आणि आधुनिक काळातील रोमान्सचे चित्रण असलेला हा सिनेमा ओटीटीवर एक फ्रेश वाऱ्याची झुळूक ठरेल.
स्पेशल ऑप्स २ । जिओ सिनेमा
क्राईम, अॅक्शन आणि थ्रिलरचा झणझणीत डोस देणारी ‘स्पेशल ऑप्स’ ही सीरिज पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. देशभक्ती, गुप्तहेरांचे मिशन आणि ड्रामा यांचा परिपूर्ण मेळ असलेल्या या सीरिजचा दुसरा भाग पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
नारिवेट्टा । सोनी लिव्ह
टोविनो थॉमसच्या चाहत्यांसाठी खास ठरणारा ‘नारिवेट्टा’ हा मल्याळम सिनेमा सामाजिक कथानक आणि उत्कट अभिनयामुळे लक्ष वेधतो. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटात गावातील संघर्ष, परंपरा आणि सत्तेच्या खेळाची अंगावर काटा आणणारी कथा आहे.
मेडियाज डेस्टिनेशन वेडिंग । नेटफ्लिक्स
हा मेडिया सिनेमॅटिक युनिव्हर्समधील १३ वा चित्रपट आहे. मेडिया पुन्हा एकदा आपल्या ठसकेबाज विनोदी शैलीसह परतत आहे. जेव्हा सिमन्स कुटुंब बहामाजमध्ये तिच्या पुतणीच्या लग्नासाठी एकत्र जमते. हा लग्न सोहळा थाटामाटात पार पडणार असतो, पण काही अनपेक्षित घटना घडतात आणि टिफनीला आपल्या होणाऱ्या नवऱ्यावर म्हणजे झेवियरवर शंका येऊ लागते. या चित्रपटात टायलर पेरी, कॅसी डेव्हिस पॅटन आणि डेव्हिड मॅन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
फोर इयर्स लेटर । लायन्सगेट प्ले
हा एक भावनिक प्रेमकथानक असलेला चित्रपट आहे. श्रीदेवी आणि यश या नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याभोवती ही कथा फिरते. त्यांच्या अरेंज मॅरेजनंतर काहीच दिवसात यश वैद्यकीय शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात जाण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर चार वर्षांनी हे दोघे पुन्हा एकत्र येतात. पण तेव्हा त्यांच्या नात्यात अनेक अनपेक्षित अडथळे उभे राहतात. या चित्रपटात शहाना गोस्वामी आणि अक्षय अजित सिंह प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
फाऊंडेशन सीझन ३ । ॲपल टीव्ही+
फाऊंडेशन या प्रसिद्ध साय-फाय मालिकेचा तिसरा सिझन प्रदर्शित होत आहे. आयझॅक अॅसिमोव्ह यांच्या पुरस्कारप्राप्त कादंबऱ्यांवर आधारित ही मालिका आहे. एका गॅलेक्टिक साम्राज्याच्या अस्ताच्या पार्श्वभूमीवर काही निर्वासित लोक मानवजातीचे भवितव्य वाचवण्यासाठी आणि नवीन संस्कृती घडवण्यासाठी एक धाडसी मोहीम राबवतात. साय-फाय प्रेमींसाठी ही मालिका पुन्हा एकदा पर्वणी ठरेल.