प्रेक्षकांच्या मनोरंजनाची पर्वणी असलेले अनेक चित्रपट आणि वेबसिरीज १८ जुलैपासून विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. ‘कुबेर’, ‘भूतनी’, ‘वीर दास: फूल वॉल्यूम’ ‘भैरवम’ ही काही प्रमुख नावे आहेत.
कुबेर। प्राइम व्हिडिओ
साऊथ सुपरस्टार नागार्जुन, धनुष आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘कुबेर’ या चित्रपटाची कथा ‘देवा’ या पात्राभोवती फिरते, ज्याची भूमिका धनुषने साकारली आहे. देवा एका भिकाऱ्याचे आयुष्य जगत असताना एका मोठ्या कटात अडकतो. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ठीकठाक कमाई केली असून आता तो प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
भूतनी । झी ५
संजय दत्त, मौनी रॉय, पलक तिवारी आणि सनी सिंह यांची प्रमुख भूमिका असलेला ‘भूतनी’ चित्रपट १ मे रोजी थिएटरमध्ये आला होता. याच दिवशी ‘रेड २’ रिलीज झाल्यामुळे ‘भूतनी’ला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु आता हा चित्रपट झी ५ वर १८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. एका कॉलेजमधील ‘वर्जिन ट्री’भोवती ही कथा फिरते, जिथे ‘मोहब्बत’ (मौनी रॉय) नावाची भूतनी दर व्हॅलेंटाईन डेला खऱ्या प्रेमाच्या शोधात जागी होते. संजय दत्तने एका बाबा आणि पैरा-फिजिसिस्टची भूमिका साकारली आहे.
वीर दास: फूल वॉल्यूम । नेटफ्लिक्स
एमी अवॉर्ड विजेता विनोदी कलाकार आणि अभिनेता वीर दास पुन्हा एकदा स्टँड-अप शोद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘फूल वॉल्यूम’ या शोमध्ये तो आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अनुभव, किस्से आणि विनोदी निरीक्षणे शेअर करणार आहे. हा शो १८ जुलैपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध असेल.
भैरवम । झी ५
मे महिन्यात थिएटरमध्ये आलेला तेलुगू चित्रपट ‘भैरवम’ आता १८ जुलैपासून झी ५ वर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात बेलमकोंडा साई श्रीनिवास, नारा रोहित आणि मंचू मनोज यांची प्रमुख भूमिका आहे. कथा पूर्वी गोदावरी जिल्ह्यातील एका पवित्र मंदिराच्या जमिनीभोवती फिरते, जिथे लोभ आणि माणुसकी यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे.
स्टार ट्रेक: स्ट्रेंज न्यू वर्ल्ड्स (सीझन ३) । जीओहॉटस्टार
‘स्टार ट्रेक: स्ट्रेंज न्यू वर्ल्ड्स’ या लोकप्रिय साय-फाय मालिकेचा तिसरा सिझन प्रदर्शित हाेत आहे. या सिझनमध्ये कॅप्टन क्रिस्टोफर पाइक आणि यूएसएस एंटरप्राइजच्या टीमला ब्रह्मांडातील अधिक धोकादायक मिशन्सवर जाताना दाखवले आहे. उत्कंठावर्धक कथा आणि जबरदस्त दृश्यांमुळे हे सीझन चाहत्यांना खिळवून ठेवणार आहे.
वॉल टू वॉल । नेटफ्लिक्स
कोरियन थ्रिलर आणि सायकोलॉजिकल ड्रामा आवडणाऱ्यांसाठी ‘वॉल टू वॉल’ ही एक विशेष मालिका आहे. वू सियोंग (कांग हा नेउल) नावाचा तरुण आपल्या आयुष्यभरात साठवलेले पैसे एका अपार्टमेंटवर खर्च करतो. मात्र तेथे गेल्यावर त्याला कळते की तेथे काहीतरी विचित्र घडत आहे.
डेलिरियम । नेटफ्लिक्स
‘डेलिरियम’ ही एक स्पॅनिश लघु-श्रृंखला आहे, जी एका प्राध्यापकाच्या जीवनावर आधारित आहे. तो आपल्या पत्नीच्या भूतकाळातील घटनांची उकल करताना तिच्या मानसिक स्थितीच्या मागची खरी कारणे शोधतो. या नाट्यमय मालिकेत एस्टेफानिया पिनेरेस, जुआन पाब्लो राबा आणि जुआन पाब्लो उर्रेगो यांच्या भूमिका असून कथा गुंतवून ठेवणारी आहे.