गेल्या काही आठवड्यांत थिएटर आणि ओटीटी दोन्ही माध्यमांवर प्रेक्षकांनी भरभरून मनोरंजनाचा अनुभव घेतला. काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, तर काही वेब सीरिजनी घरबसल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. याच प्रवाहात, २५ जुलैपासून ओटीटीवर काही बहुप्रतिक्षित वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होणार असून, यामध्ये थरार, रहस्य, प्रेमकथा, ड्रामा आणि देशभक्ती अशा विविध प्रकारांचा समावेश आहे.
मंडला मर्डर्स । नेटफ्लिक्स
नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्सच्या जोडीने साकारलेली ही रहस्यकथा ‘मंडला मर्डर्स’ प्रेक्षकांना एका थरारक प्रवासावर घेऊन जाणार आहे. या वेब सीरिजमध्ये वाणी कपूर एका इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ‘रिया थॉमस’च्या भूमिकेत दिसणार आहे, तर तिच्यासोबत सुरवीन चावला, श्रिया पिळगावकर आणि रघुवीर यादव प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. चरणदासपूर नावाच्या गावातील एका प्राचीन उपकरणाभोवती गुंफलेली ही कथा गूढ, भय आणि सत्याचा शोध अशा प्रवाहातून पुढे सरकते. ‘क्राइम थ्रिलर’ आवडणाऱ्यांसाठी ही मालिका एक न विसरता येणारा अनुभव ठरणार आहे.
सरजमीन । डिज्नी+ हॉटस्टार
काजोल, इब्राहिम अली खान, पृथ्वीराज सुकुमारन व मिहिर आहुजा अभिनीत ‘सरजमीन’ हा चित्रपट २५ जुलैपासून जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. या चित्रपटाची कथा एका लष्करी अधिकाऱ्याची आहे, जो काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे. काजोलने या चित्रपटात इब्राहिमच्या आईची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट कयोज इराणी यांनी दिग्दर्शित केला आहे.
रंगीन । प्राइम व्हिडीओ
विनीत कुमार सिंग, राजश्री देशपांडे, तारुक रैना आणि शीबा चड्ढा यांचा अभिनय असलेला हा शो एक रोमांचक डार्क ड्रामा आहे. एका पुरुषाच्या झालेल्या विश्वासघातावर आधारित ही कथा एका बदला घेण्याच्या प्रवासात बदलते. ही वेब सीरिज मानवी भावनांचा खोलवर वेध घेत, नात्यांमधील गुंतागुंत अधोरेखित करते.
सौंकन सौंकने २ । झी ५
पंजाबी सिनेमाच्या चाहत्यांसाठी ही एक भन्नाट भेट आहे. निमरत खैरा, सरगुन मेहता, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग आणि एमी विर्क या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका असलेला हा चित्रपट एका अशा पतीभोवती फिरतो ज्याची एक बायकाे आहे आणि त्याची आई त्याच्यासाठी दुसरी पत्नी आणते आणि पुढे सुरू होतो हास्य, भावनांचा आणि नात्यांमधील संघर्षांचा खेळ.
ट्रिगर । नेटफ्लिक्स
‘अॅक्शन-थ्रिलर’ चाहत्यांसाठी ‘ट्रिगर’ एक परफेक्ट शो आहे. किम नाम गिल आणि किम यंग क्वांग या कोरियन स्टार्सनी साकारलेला हा शो वेगवान घटनाक्रमाने भरलेला असून, जबरदस्त अॅक्शन सीन आणि चक्रावून टाकणाऱ्या ट्विस्ट्सने भरलेला आहे. कोरियन कंटेंटचे वेड असलेल्यांसाठी हा शो न चुकवण्यासारखा आहे.
हॅपी गिलमोर २ । नेटफ्लिक्स
अमेरिकन स्पोर्ट्स-कॉमेडी शैलीतला ‘हॅपी गिलमोर २’ हा चित्रपट एक धमाल कॉमेडी अनुभव देतो. प्रथम भागात गाजलेल्या पात्रांच्या वापरातून आणि नव्या मजेशीर प्रसंगांतून, हा सिक्वेल प्रेक्षकांना भरपूर हसवण्याचे काम करेल.
अंटिल डाऊन । नेटफ्लिक्स
हॉरर आणि सस्पेन्स यांच्या मिश्रणात तयार झालेला हा अमेरिकन चित्रपट प्रेक्षकांना भारावून टाकतो. दिसायला शांत असलेली एक जागा जेव्हा एक भयावह वास्तव उघड करते, तेव्हा त्या कथेमध्ये काय घडते, हे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणार आहे.
द विनिंग ट्राय । नेटफ्लिक्स
‘द विनिंग ट्राय’ हा कोरियन ड्रामा एका बदनाम रग्बी सुपरस्टारच्या जीवनावर आधारित आहे. हा सुपरस्टार आपल्या वैयक्तिक अडचणींमधून मार्ग काढताना एका संघर्ष करत असलेल्या हायस्कूल रग्बी टीमला चॅम्पियनशिप जिंकून देतो आणि त्यातून त्याला आयुष्यातील नवीन उद्दिष्ट व प्रेरणा मिळते.