गेल्या ४ वर्षात काँग्रेसचे तब्बल २१ आमदार फुटल्याने काँग्रेस पार खिळखिळी झाली आहे. १९४७ ते १९७७ ही तब्बल ३० वर्षं देशात अव्याहतपणे सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाची देशभरात वाताहत उडालेली आहे. देशातील काँग्रेसजनांना एका धाग्यात बांधून ठेवू शकेल असे राष्ट्रीय वलय असलेला कोणी नेता दिसत नाही.
विधानसभा निवडणुकीत आपल्या बंडखोरीमुळे काँग्रेसला काठावरचे बहुमत मिळेल आणि आपल्याकडे ४ आमदारांचा भक्कम गट असल्याने आपणच मुख्यमंत्री होणार असे भाजपाला खिंडार पाडून काँग्रेस निवासी झालेले मायकल लोबो यांना वाटत होते पण दैवाने त्यांना धोका दिला. म्हापसाचे माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांनी उघड बंड केले. त्यामुळे भाजपा उमेदवारांने बाजी मारली आणि मायकलचा उमेदवार आपटला. दक्षिणेत काँग्रेसचा बालेकिल्ला नावेली मतदारसंघ भाजपा विरोधी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याने काँग्रेसच्या हातातून निसटला आणि भाजपाच्या खिशात आयताच गेला. सांत आंद्रे मतदार संघ काँग्रेसने थोडक्यात गमावला. मायकल लोबो यांचा बारदेश तालुक्यात बराच प्रभाव आहे. पण थिवीत त्यांची डाळ शिजली नाही आणि काँग्रेसला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले. सरकार नाही तरी मायकलने दिगंबर कामत यांच्यावर मात करत विरोधी पक्ष नेतेपद पदरात पाडून घेतले आणि सरकार विरोधात जोरदार भाषणबाजी चालू केली. या टिकेचा अहवाल दिल्लीत पोहचला. मायकलला नगरनियोजन खात्याच्या १०-१५ नोटिसा एका मागोमाग एक पोहचल्या विरोधी पक्ष नेतेपद नको झाले. आवाज बंद झाला. आठ आमदारांना घेऊन स्वगृही परतण्याचा प्रस्ताव पुढे आला.
पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजे ११ पैकी ८ आमदारांची गरज होती. त्यासाठी फारशी धावपळ करावी लागली नाही. सर्वसाधारणपणे मंत्रीपद मिळत असल्यास अकराही म्हणजे, १०० टक्के काँग्रेस आमदार फुटण्यास तयार होते. पण एकही जागा खाली नसल्याने कोणालाही मंत्रीपद मिळणार नाही हे सगळ्यांना बजावून सांगितले. आठ आमदार राजी झाले. भाजपात प्रवेश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ८ आमदार एकत्र आले एवढ्यातच एका आमदाराला त्यांच्या पत्नीचा फोन आला.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या काँग्रेसच्या सर्व आमदारांनी बोडगेश्वर मंदिर, पणजीत श्री महालक्ष्मी मंदिर, बांबोळी येथील फुलांचा खुरीस आदी ठिकाणी जाऊन पक्षांतर करणार नाही अशी शपथ घेतली होती याची आपल्या आमदार पतीला आठवण करून दिली. ही शपथ मोडून पक्षांतर केले तर तुम्हाला शिक्षा करेल असा इशारा "त्या" पत्नीने दिला. देवाचा कोप होईल अशी भीती वाटल्याने त्या धर्मभोळ्या आमदाराने काढता पाय घेतला.
एका आमदाराने ऐनवेळी पळपुटेपणा केल्याने मायकल लोबो व इतर आमदार नाराज झाले. गळाला लागण्याची शक्यता असलेले नुवेचे आमदार अलेक्स सिक्वेरा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्वरित मंत्रीपद मिळत असल्यास मी तयार आहे असा संदेश मिळाला. झाले, सगळे ठरले. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि इतर सहा आमदार मिळून ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. भाजपा आमदारांचे विधानसभेतील बळ एकदम २८ वर गेले. काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांनी सामूहिक पक्षांतर केल्याने काँग्रेसचे तीनच आमदार विधानसभेत उरले. विधानसभा नियमानुसार सभागृहात किमान ८ आमदार असले तरच त्या गटाच्या नेत्यांना विरोधी पक्षनेते हे बिरुद मिळते. काँग्रेसकडे केवळ ३ आमदार असल्याने त्या गटाचे नेते यूरी आलेमाव यांना विरोधी पक्षनेत्याला मिळणाऱ्या सुविधा मिळत नाही. विरोधी पक्षनेत्यांना विधानसभेत कार्यालय, कर्मचारी आदी सुविधा मिळतात.
विशेष बाब म्हणून सरकारने या सुविधा दिल्या आहेत. मगोचे २ आणि भाजपाचे २८ मिळून एकूण ३० आमदारांचे भक्कम पाठबळ असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी "स्वयंपूर्ण गोवा" मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य जनतेला घरबसल्या आपली कामे करता यावी म्हणून बहुतेक सर्व सरकारी खात्यांनी ऑनलाईन सेवा उपलब्ध केली आहे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोवा राजकीयद्रष्ट्या बराच ढवळून निघाला. उत्तर गोवा मतदारसंघात भाजपाचे नेते श्रीपाद नाईक सतत सहाव्यांदा निवडणूक आखाड्यात उतरले होते. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे मातब्बर नेते माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप निवडणूक रिंगणात उतरले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या ८ आमदारांनी सामूहिक पक्षांतर करून भाजपाचा आश्रय घेतल्याने गोमंतकीय मतदारांचा काँग्रेस पक्ष आणि नेत्यांवरील विश्वासच उडाला आहे. ही परिस्थिती केवळ गोव्यातच नव्हे तर संपूर्ण देशातच पाहायला मिळाली. काँग्रेस पक्ष संघटना किंवा स्थानिक नेत्यांनी फारसे सहकार्य किंवा मदत न करताही उमेदवार रमाकांत खलप यांनी स्वबळावर खिंड लढवली. त्यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि श्रीपाद नाईक प्रचंड मतांनी विजयी होऊन नवा विक्रम निर्माण केला.
मायकल लोबो व दिगंबर कामत यांच्या बरोबर काँग्रेसच्या एकूण ८ आमदारांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला होता. एक अलेक्सा सिक्वेरा वगळता इतर कोणालाही भाजपाने कोणतेही आश्वासन दिले नव्हते. त्यामुळे अमूक आमदाराला मंत्री करणार तमूक आमदाराला उपमुख्यमंत्री करणार या बातम्यात कोणतेच तथ्य नव्हते, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत किंवा गोवा प्रदेश भाजपचे तत्कालीन अध्यक्ष खासदार सदानंद तानावडे यांनी मंत्रीमंडळ फेररचनेबद्दल कधीच कोणतेही निवेदन केलेले नाही. कारण नवे मंत्री घ्यायचे झाल्यास सध्या मंत्री असलेल्या कोणाला तरी डच्चू लागेल
कोणाला डच्चू द्यायचा हा मोठा गंभीर विषय आहे. लोकसभा निवडणूक जवळ आली तेव्हा अलेक्स सिक्वेरा यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ येऊन ठेपली. बारदेश तालुक्यातील एका मंत्र्याला काढून अलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीपद देण्यास भाजपाच्या कोअर कमिटीने आक्षेप घेतला व एखाद्या अल्पसंख्याक व्यक्तीला मंत्री करायचे असल्यास एखाद्या अल्पसंख्याक व्यक्तीलाच डच्चू द्या अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केली. कोअर कमिटीचा हा आदेश शिरसावंद्य मानून निलेश काब्राल यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा संदेश गेला. संदेश न मानण्याचा प्रश्नच नव्हता. नीलेश काब्राल यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेच अलेक्स सिक्वेरा यांचा शपथविधी झाला.
दक्षिण गोव्याची जागा कोणत्याही परिस्थितीत हातची जाऊ द्यायची नाही म्हणून गोवाभर आदरभाव असलेल्या धेंपे उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपे यांची पत्नी सौ. पल्लवी धेंपे यांना भाजपाची उमेदवारी दिली, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापासून बूथ पातळीवरील पन्ना प्रमुखापर्यंत सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी कंबर मोडून काम केले. नुवे मतदारसंघाने दगा दिला. अलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीपद दिल्याने भाजपाच्या मतात १० मतांचीही भर पडली नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीत नुवे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात येणार हे नक्की आहे. त्यामुळे सिक्वेरा तेथून निवडणूक लढवू शकणार नाहीत. ते आताच दिल्लीत गंभीर आजारावर उपचार घेऊन गोव्यात परतले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्यांचे माजी सहकारी सदानंद तानावडे यांनी गेल्या ६ वर्षात काँग्रेसचे १९, मगोचे २ आणि गोवा फाॅरवर्डचा १ मिळून २२ आमदार फोडले. २०१९ मध्ये फुटलेले बरेच आमदार कालबाह्य ठरले आहेत. त्यामुळेच २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बरेच नवे चेहरे विधानसभेत दिसले होते.गेल्या ४ वर्षात काँग्रेसचे तब्बल २१ आमदार फुटल्याने काँग्रेस पार खिळखिळी झाली आहे. १९४७ ते १९७७ ही तब्बल ३० वर्षं देशात अव्याहतपणे सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाची देशभरात वाताहत उडालेली आहे. देशातील काँग्रेसजनांना एका धाग्यात बांधून ठेवू शकेल असे राष्ट्रीय वलय असलेला कोणी नेता दिसत नाही.
गुरुदास सावळ
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)