कुर्रर्र कुर्रर्र कुरतड!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
03rd August, 12:06 am
कुर्रर्र कुर्रर्र कुरतड!

माझ्या प्रिय बालमित्र-मैत्रिणींनो आज आपण एक वेगळा विषय समजून घेणार आहोत. परीक्षा सुरू झाली किंवा होणार असेल आणि आपला जर अभ्यास झाला नसेल किंवा अभ्यास झालाय तरी तुमच्यापैकी काही जणांना परीक्षेची खूप भीती वाटत असेल तर मग नकळत काय होतं माहितीये??? परीक्षेच्या ताणामुळे किंवा इतर कोणत्याही ताणामुळे, भीतीमुळे, आपल्या मनात गोंधळ होत असल्यामुळे आपल्याला नकळत एक चुकीची सवय लागते... आपण नखं किंवा हातात असलेली पेन्सिल नकळत कुरतडतो. या सवयीने आपल्या आरोग्याला त्रास होतो बरं. म्हणून ही सवय जर असेल तर ती लगेच मोडली पाहिजे. 

ही सवय का टाळायला हवी?

नखांमध्ये घाण व जंतू जमतात. नखं कुरतडताना ही घाण आणि जंतू तोंडावाटे आपल्या शरीरात शिरतात. त्यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, पोटात जंत होणे यांसारखे त्रास होऊ शकतात.

नखं सतत कुरतडल्याने ती छोटी होतात. नखांच्या खालच्या मऊ त्वचेवर दात लागून जखम होऊ शकते. त्यातून रक्तस्राव सुद्धा होऊ शकतो. 

पेन्सिल किंवा इतर गोष्टी कुरतडल्याने, त्या वस्तूतील केमिकल किंवा विषारी घटक आपल्या शरीरात जाण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे सुद्धा पोटाचे काही आजार होऊ शकतात. 

आपले दात सुद्धा या कुरतडण्याच्या सवयीमुळे झिजू शकतात. 

आणि आपल्याला असं नखं कुरतडताना कोणी पाहिलं तर लाज वाटू लागते. 

नखं कुरतडायची सवय थांबवण्यासाठी काय करावं?

टेन्शन आलं किंवा भीती वाटली की एक मोठा श्वास नाकातून घ्यायचा आणि फुगा फुगवताना आपण जशी तोंडातून हवा बाहेर सोडतो तशी सोडावी. असे १० ते ११ वेळा करावे. असे केल्याने आपले मन शांत होते आणि भीती कुठल्या कुठे पळून जाते. 

नखं नियमित कापावी व स्वच्छ ठेवावी. नखं कापलेली असतील तर ती कुरतडता येत नाहीत. 

भीतीमुळे नखं कुरतडत असाल तर भीती कमी करण्यासाठी रोज हनुमान चालीसा म्हणावी. 

आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या कारणामुळे भीती वाटते ते कारणंच काढून टाकावं. उदाहरण म्हणजे तुम्हाला जर परीक्षेची भीतीच वाटू नये असे वाटत असेल तर रोज थोडा थोडा अभ्यास, पाठांतर करत रहावं. त्यामुळे अभ्यास आधीच झालेला असल्याने परीक्षा जवळ आली की आपोआप ताण कमी होणार  आणि तुम्ही नखं अजिबात कुरतडणार नाहीत. 

चला मग, लागा कामाला. रोज थोडा थोडा अभ्यास करा, हनुमान चालीसा रोज म्हणा, नखं नीट कापा आणि चुकीच्या सवयी लगेच बदला.


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य