जादूचे प्रयोग

Story: छान छान गोष्ट |
7 hours ago
जादूचे प्रयोग

हाश्श हुश्श करत एकदाची पृथा पोहोचली बाबा छोटूदादाच्या शाळेजवळ.

शाळा होतीच कुठे पण? तो तर होता एक भलामोठा वाडा! मोठ्ठं अंगण होतं – शेणानं सारवलेलं. मधोमध ऐसपैस तुळशीवृंदावन होतं.

आजोबांना बघताच शाळेतून एक १४–१५ वर्षांचा मुलगा लगबगीने त्यांच्याकडे आला. त्याने खूप अगत्याने सगळ्यांचं स्वागत केलं.

“आजोबा, आजी, या ना! अरे वा पृथा, गुंड्यालाही सोबत आणलंस? छानच की!”

पृथा विचार करतच होती मनातल्या मनात, ‘हा कोण बरं दादा? आणि मला, गुंड्याला कसा काय ओळखतो?’

इतक्यात तो दादा, पृथाच्या मनातलं ऐकू आपल्याप्रमाणे म्हणाला,

“बरं का पृथा, मी पवन. या शाळेत नववीच्या वर्गात शिकतो. छोटूनं सांगितलं होतं तुझ्याबद्दल! त्यानं मला अगदी बजावून सांगितलंय तुमचं जंगी स्वागत करायला!”

“म्हणजे छोटू दादा नाहीये का?” पृथा अगदी खट्टू झाली.

“आहे ना! तो पवार गुरुजी आणि बाकी मुलांबरोबर मागच्या बाजूला जादूचे प्रयोग करतोय!”

“काय??? जादूचे प्रयोग? कम्माल आहे बुवा छोटू दादाची! हा जादूचे प्रयोग शिकतो आणि इतक्या दिवसात एकदाही सांगितलं नाही पठ्ठ्याने!"

हातातलं बास्केट तिथेच खाली ठेवून पृथा थेट मागच्या बाजूला पळाली.

“अगं अगं, थांब! ऐक तरी... आत तर ये!”

पवन दादा मागून हाका मारत होता. पण ‘जादूचे प्रयोग’ म्हटल्यावर पृथा कसली थांबते आहे? मागोमाग आजी, आजोबा व आईबाबांनाही जावंच लागलं!

वाड्याच्या मागच्या बाजूला मोठाली बाग होती. बागेत पवार गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी काम करत होते. कुणी फुलं तोडत होतं, कुणी भाजी तोडत होतं, कुणी झाडांना पाणी देत होतं, तर कुणी वेलींवरची किडकी पानं शोधून शोधून काढून टाकत होतं.

पवार गुरुजींचे तर दोन्ही हात मातीने बरबटलेले होते. तसेच हात हलवून त्यांनी आजोबांचं आणि बाकी सगळ्यांचं स्वागत केलं.

“इथे कुठे आहेत जादूचे प्रयोग? आणि कुठे आहे जादूगार?” पृथा खूपच हिरमुसली.

“जादूगार? हा काय?”

पवार गुरुजींनी आकाशाकडे हात दाखवला.

“कोण? सूर्य?? हँ... तो कुठे जादू करतो?”

खरंतर पृथाला आता या पवार गुरुजींचा आणि त्या पवन दादाचा खूपच राग येऊ लागला होता. हे लोकं चक्क फसवत होते तिला!

“फक्त सूर्यच नाही काही... सूर्य, माती, पाणी, वारा – हे सगळे मिळून जादू करतात बरं का, पृथा! ये, दाखवतो तुला.” 

तिथेच एका बाजूला, एका स्वच्छ दगडावर थोडे धणे (सुक्या कोथिंबिरीच्या बिया) ठेवले होते. एक दादा एका लाकडी फळीने ते धणे हलकेच चिरडत होता.

“पृथा, तुला माहीत आहे का, हे काय आहे?” पवार गुरुजींनी मिश्किलपणे विचारलं.

“होच मुळी! आईच्या मसाल्याच्या डब्यात असतात हे – धणे म्हणतात त्याला!”

पृथानं लगेच आपण हुशार आहोत हे दाखवून दिलं.

“अरे वा! छान माहीत आहे की तुला सगळं... मग आता या धन्यांची मी कोथिंबीर बनवून दाखवली तर?” पवार गुरुजींनी जादुगारासारखे हातवारे करत विचारलं.

“कोथिंबीर? म्हणजे भाजीवालीकडे मिळते ती?” आता काहीतरी धम्माल पहायला मिळणार म्हणून पृथा उत्साहाने म्हणाली –“दाखवा, दाखवा!”

“अगडम बगडम जादूचा तगडम,

धन्यांची ताबडतोब कोथिंबीर करम्!

तिकडे बघ..."

गुरुजींनी एका भाजीच्या वाफ्याकडे बोट दाखवलं. जमिनीतून कोथिंबीरीची इवलीइवलीशी रोपं वर आली होती. मस्त वाऱ्यावर डुलत होती.

सकाळचं कोवळं ऊन त्यांच्यावर पडलं होतं, आणि ती जणू त्या उन्हाशी खेळत होती.

“पृथा, ते धणे आहेत ना? ते म्हणजे या कोथिंबिरीच्या बिया!

एक दाणा म्हणजे एकमेकांना चिकटलेल्या दोन बिया असतात. त्या हलकेच चिरडून वेगळ्या करायच्या – तो दादा करतोय ना तशा!

मग जमीन अशी छान खणून घ्यायची. दगड धोंडे काढून टाकायचे. माती छान भुसभुशीत झाली की त्यात या बिया पेरायच्या. मग ७–८ दिवस अगदी थोडं थोडं पाणी घालायचं.

तू शॉवर चालू करून आंघोळ करतेस की नाही? अगदी तसं. बदाबदा पाणी ओतायचं नाही हां! मग ही माती, हा सूर्य, हे पाणी – सगळेजणं करतात जादू...

अगडम बगडम... आणि धन्याची होते कोथिंबीर!

महिनाभर ही कोथिंबीर उन्हाशी खेळत खेळत छान मोठी होते. मग ती वरच्या वर खुडायची. मुळापासून उपटायची नाही हां! ही बघ, अशी!”

गुरुजींनी कोथिंबिरीचा एक देठ तोडून पृथाच्या हातात दिला.

ही अशी जमिनीतून उगवलेली कोथिंबीर पृथा पहिल्यांदाच पाहत होती. खरंच, एखादी जादू पाहिल्यासारखी ती त्या कोथिंबिरीच्या इवल्याशा देठाकडे पाहातच राहिली.

“आवडली जादू?

तिथे त्या मांडवावरची वेल बघते आहेस? सांग बघू, ती वेलीवरची फळं कसली आहेत?”

"ती? हिरवी लांबट फळं... कसली बरं असतील?" पृथाला काही समजेना.

"ऊं... हूं... "तिनं खांदे उडवत म्हटलं – “नाही येत ओळखता.”

“अगं, हा आपला दुधी भोपळा!”

“दुधी भोपळा? पण तो तर केवढा मोठ्ठा असतो! हे फळ तर एवढ्ढुसं आहे!”

“अगं, आधी हे फळ असं लहानसं असतं. मग ही माती, हा सूर्य, हे पाणी... काय करतात?”

“अगडम बगडम जादूचा तगडम!”

पृथा आणि तिच्याबरोबर सगळेच दादा जादुगारसारखे हातवारे करत ओरडले.

पृथाला तर खूपच आवडले हे जादूचे प्रयोग!


डाॅ. गौरी प्रभू 
९०८२९०५०४५