श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला असे उत्सव आपण साजरे केले. आम्हा सर्वांचं प्रिय दैवत म्हणजेच आपला कान्हा... श्रीकृष्ण. तुम्ही सर्वजण सुद्धा उत्साहाने श्रीकृष्ण व राधेची वेशभूषा करून तुमच्या सावंगड्यांसोबत गोपाळकाला, दहीहंडी व विविध खेळ खेळून या उत्सवाचा पुरेपूर आनंद घेतला असेलच. श्रीकृष्णाला अनेक गोष्टी प्रिय आहेत जसे की मुरली, आपले सावंगडी, दूध, दही, तूप आणि लोणी सुद्धा. आज आपण लोणी आरोग्यासाठी कसे उपयोगी आहे ते बघूया.
लोण्याला संस्कृत भाषेत नवनीत म्हणतात. तुम्ही लोण्याला कधी स्पर्श करून बघितलं आहे का?? एकदा मुद्दाम बघा. लोणी चवीला गोड असतं. त्यामुळे लहान मुलांना लोणी आवडतं.
लोणी शरीराची ताकद वाढवतं. म्हणूनच तर श्रीकृष्ण स्वतः लोणी खात व आपल्या सांगड्यांना सुद्धा लोणी देत.
लोणी खाल्ल्याने त्वचा लोण्यासारखी मऊ आणि स्निग्ध होते.
लोणी डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे.
लोणी खाल्ले असता जीभेची चव सुद्धा सुधारते.
लोणी गुणाने थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करते.
शरीरातील उष्णता वाढून डोकं दुखत असल्यास चमचाभर लोणी डोक्याला मध्यभागी चोळले असता डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ थांबते.
सुका खोकला येत असेल, घसा दुखत असेल तर चमचाभर लोणी थोडं थोडं चाटून खाल्ले असता खोकला कमी होतो.
तसेच लोणी हे स्मरणशक्ती वाढवणारे आहे. त्यामुळे अभ्यास, पाठांतर करणारी तुमच्यासारखी जी मुलं आहेत त्यांनी लोणी खाल्लं पाहिजे.
जे शरीराने बारीक आहेत व ज्यांना आपले शरीर पुष्ट करायचे आहे त्यांनी लोणी खावे.
पण हे लोणी म्हणजे बाजारात प्रीझर्वेटीव घातलेले पॅकेट मधले लोणी नाही हा. घरी दुधाची साय किंवा दह्यापासून केलेल्या ताज्या लोण्याचे वरील सर्व फायदे आहेत. त्यामुळे असे घरी तयार केलेले लोणी खावे. भगवान श्रीकृष्णाला प्रिय असलेले लोणी हे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे समजलं?? कधीतरी जॅम, चीज, चॉकलेट स्प्रेड ऐवजी लोणी व साखर चपातीला लावून खाऊन बघा हं.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य