आपल्या आवडीचा श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण आपल्या आवडीचा कारण या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात जसे की नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रावणी सोमवार, आयतार पूजन इ. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने चविष्ट नैवेद्य देवाला अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून आपल्याला या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. वेगवेगळ्या चवींचे पदार्थ खायला मजा येते. एक गोष्ट मात्र श्रावणात आपल्याला खायला मिळत नाही ती म्हणजे मांसाहार म्हणजेच मासे, अंडी, चिकन इ. माशांचे तळलेले, झणझणीत पदार्थ बऱ्याच जणांना खूप आवडतात. तरी सुद्धा श्रावणात मात्र असे पदार्थ खायचे नाहीत असे आजी आपल्याला सांगते. कारण श्रावणात शाकाहार सेवन करणेच आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.
श्रावणात शाकाहारच का ???
आयुर्वेदशास्त्र सांगतं की पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमी होते. मासे आणि मांसाहार पचायला जड असतो. त्यामुळे खाल्लेले मासे नीट पचले नाहीत तर अपचन, मळमळ, जुलाब, पोटदुखी होऊ शकते. आणि आजारी पडल्यामुळे आपली शारीरिक ताकद कमी होते. शाळा बुडते, अभ्यास अपूर्ण राहतो, खेळायला, मजा करायला सुद्धा मिळत नाही.
तसेच पावसात नद्यांमध्ये, समुद्रात सांडपाणी मिसळतं, पाणी प्रदूषित होतं. अश्या अस्वच्छ पाण्यातले मासे खाल्ल्याने त्वचा रोग, ताप येणे, उलटी - जुलाब होणे यासारख्या तक्रारी सुरू होतात.
वर्षभर आपण चटपटीत, तळलेले पदार्थ खातो की नाही??? त्यामुळे आपल्या पचनसंस्थेला हे पदार्थ पचवायला आपली शक्ती सतत खर्च करावी लागते. श्रावणात पचायला हलके असे पदार्थ खाल्ले असता आपल्या पचन संस्थेला सुद्धा थोडी विश्रांती मिळते.
शिवाय आपण वर्षाचे बाराही महिने मासे खात राहिलो तर नवीन मासे तयार करायला निसर्गाला वेळ सुद्धा मिळणार नाही. श्रावणात नवीन मासे तयार होण्यासाठी निसर्गाला सुद्धा वेळ मिळेल.
पावसाळा संपला की आपली पचनशक्ती पुन्हा वाढेल – तेव्हा पुन्हा मासे खायला काही हरकत नाही. पण श्रावणात आरोग्य टिकवण्यासाठी मासे खाणं थोडं थांबवलेलं बरं! आणि मासे जरी नाही खायला मिळाले तरी चविष्ट रानभाज्या, पातोळ्या, गोड पोळे, तांदूळ - मूगडाळ - गूळ घालून केलेली गोड खिचडी असे कितीतरी चविष्ट पदार्थ आजी - आई करतात. ऋतूच्या बदलानुसार खाणं-पिणं बदललं तर आजार होण्याची शक्यता कमी होते आणि त्यासाठी आपल्या सण-वारांनुसार अन्न खाणे ही सगळ्यात सोप्पी पद्धत. चला तर मग श्रावण पाळुया आणि आरोग्य मिळवूया.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य