गणपती बाप्पाचा ‘हरवलेला पासवर्ड’

Story: छान छान गोष्ट |
24th August, 12:07 am
गणपती बाप्पाचा ‘हरवलेला पासवर्ड’

मोहनच्या घरात दरवर्षी गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी होत असे. आई लाडू बनवत असे, बाबा आरास करीत आणि मोहनला तर बाप्पाच्या आगमनाने खूप छान वाटत असे. पण यावर्षी मोहनच्या मनात वेगळीच कल्पना आली.

मोहन (मनात विचार करत): “बाप्पा फक्त आपल्या घरात राहतात, आपण केलेली आरती स्तोत्रं ऐकतात, लाडू खातात... पण त्यांना आमचं शाळेचं, मोबाइलचं, इंटरनेटचं जग माहीत असेल का? जर बाप्पा एक दिवस माझ्यासोबत फिरले तर किती मजा येईल!”

गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी आरती झाल्यावर मोहनने गणपती बाप्पाकडे हळूच इच्छा व्यक्त केली – “बाप्पा, शाळेची सुट्टी संपल्यावर तुम्ही माझ्या शाळेत याल का? मित्रमैत्रिणींना भेटा, त्यांना गोष्ट सांगाल का?... आम्हाला आवडेल अशी फोनवाली !”

बाप्पा हसले, पण काही बोलले नाहीत. मोहन झोपायला गेला.

मध्यरात्री अचानक खोलीत प्रकाश पसरला.

मोहन: “काय? स्वप्न आहे का हे?”

पण नाही... बाप्पा मूर्तीमधून बाहेर आले होते!

बाप्पा: “मोहन, मी तुझी इच्छा ऐकली आहे. सुट्टी संपल्यावर मी तुझ्यासोबत शाळेत येणार आहे. पण लक्षात ठेव, मी साध्या रूपात येईन, नाहीतर सगळे फोटो काढण्यातच गुंतून जातील.”

मोहन हसला, “ठीक आहे बाप्पा, पण मास्क घालायला लागेल... आमच्या शाळेत मास्क लावणं बंधनकारक आहे.”

बाप्पा: “अरे वा! तुमची शाळा आणि तुम्हीही तब्येतीची काळजी घेता, हे मला आवडलं.”

सुट्टी संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी मोहनच्या शेजारी साध्या कपड्यांतील, डोक्यावर छोटीशी मुकुटवाली टोपी असलेले, हसतमुख “काका” उभे होते.

शाळेच्या गेटवर पोहोचल्यावर, मोहनचा मित्र आदित्य त्याला चिडवत म्हणाला, “अरे मोहन, हे तुझे लांबचे काका आहेत का?आम्ही कधी बघितलं नाही यांना?”

मोहन: “हो, यंदा गणेश चतुर्थीला आलेत आमच्याकडे खूप वर्षांनी. काका आज तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहेत!”

पहिल्या तासातच शिक्षकांनी त्या ‘काकांना’ वर्गासमोर बोलावलं.

शिक्षक: “मुलांनो, आज आपल्याकडे खास पाहुणे आले आहेत. ते आपल्याला गोष्ट सांगणार आहेत.”

बाप्पा पुढे आले, त्यांच्या डोळ्यांत चमक होती आणि चेहऱ्यावर गोड हसू होतं.

बाप्पा: “गुड मॉर्निंग, मित्रांनो! आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. पण ही गोष्ट खूप जुनी नाही... ती अगदी तुमच्यातलीच आहे.”

गोष्टीचं नाव आहे ‘हरवलेला पासवर्ड’

“एका छोट्या गावात आर्यन नावाचा मुलगा राहत होता. त्याला ऑनलाईन गेम्स खूप आवडायचे. दररोज शाळेतून आल्यावर तो होमवर्क आटोपून लॅपटॉपसमोर बसायचा.

त्याने एक गेम अकाऊंट तयार केलं होतं, त्यात त्याने खूप पॉइंट्स, बक्षिसं जिंकली होती.

पण... एके दिवशी त्याचा मित्र कबीर म्हणाला,

कबीर: ‘अरे, तुझा पासवर्ड सांग ना, मी पण तुझ्या अकाऊंटमध्ये खेळून बघतो.’

आर्यनला वाटलं, मित्राला सांगण्यात काय हरकत आहे? आणि त्याने पासवर्ड सांगितला.

दुसऱ्या दिवशी... सगळं बदललं! आर्यनचे पॉइंट्स गायब, बक्षिसं गहाळ झाली होती आणि गेममध्ये त्याचं नावच राहिलं नाही.

आर्यन खूप रडला.

साक्षी म्हणाली,

साक्षी: ‘आर्यन, जसं तू पिगी बँकेत पैसे ठेवतोस आणि कुणालाच चावी देत नाहीस, तसं इंटरनेटवरही आपली गुपितं जपायला हवीत. पासवर्ड म्हणजे तुझ्या खजिन्याची चावी!’

आर्यनला समजलं. त्याने नवा पासवर्ड टाकला आणि पुढे कुणालाही न सांगण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर इतर मित्रांनाही हा धडा शिकवला.”

गोष्ट संपताच वर्गात चर्चा सुरु झाली.

रुचिरा: “हो खरंय, माझं ईमेल अकाऊंट पण एकदा हॅक झालं होतं.”

आदित्य: “मी तर पासवर्ड नेहमी वहीत लिहून ठेवतो, आता पुढे लपवून ठेवणार.”

बाप्पा म्हणाले, “बरोबर! मोबाइल, संगणक, इंटरनेट  हे सगळे तुमचे मित्र आहेत, पण तुम्ही सावधगिरी बाळगा व सुरक्षित रहा. तसेच प्रामाणिकपणा विसरू नका.”

शेवटी बाप्पा हसून म्हणाले,

“तुम्हाला माहीत आहे ना, मला मोदक का आवडतात? कारण मोदकासारखं गोड ज्ञान मी नेहमी साठवून ठेवतो. तुम्ही पण रोज एक ‘ज्ञानाचा मोदक’ खा. म्हणजे रोज काहीतरी नवं शिका.

आणि हो, खरी बुद्धी म्हणजे काय? तर  चांगली कामं करणं, गुपितं जपणं, मित्रांना मदत करणं आणि चुकीच्या गोष्टी टाळणं.”

सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. मोहनला तर मनापासून खूप बरं वाटलं. कारण त्याची इच्छा पूर्ण झाली होती.

शाळा सुटल्यानंतर मोहन आणि बाप्पा घरी परतले. संध्याकाळी आरतीवेळी बाप्पा पुन्हा मूर्तीमध्ये शांतपणे बसले आहेत असं वाटलं.

मोहन आईला म्हणाला,

“आई, आज बाप्पा आमच्या शाळेत आले होते, त्यांनी मुलांना गोष्ट सांगितली. ती गोष्ट सगळी आमच्या आताच्या घडणाऱ्या गोष्टींशी जुळणारी होती!”

आई हसून म्हणाली म्हणजे बाप्पा फक्त भक्तांचे ऐकत नाहीत, तर काळानुसार शिकवण देतात!


मंजिरी वाटवे