पवार गुरुजींचे सकाळचे जादूचे प्रयोग आटोपल्यावर सगळ्यांनी स्वच्छ हातपाय धुतले. पवार गुरुजींनी पृथाच्या आईबाबांना सगळी बाग फिरवून दाखवली...आणि छोटू दादाने पृथाला! केवढं काय काय पिकवलं होतं पवार गुरुजींनी आणि या छोट्या मुलांनी मिळून! टोमॅटो, मिरची, वांगी, काकडी, दुधी भोपळा, लाल माठाची भाजी — एवढ्या सगळ्या प्रत्यक्ष झाडाला लगडलेल्या भाज्या पृथाने पहिल्यांदाच पाहिल्या. अगदी हरखून गेली होती ती. बाबाही ती बाग पाहून चकित झाला. तो पवार गुरुजींना म्हणाला, “हे खरंच जादूचं वाटतंय. तुम्ही आणि मुलांनी मिळून एवढी सुंदर बाग फुलवली, हे खरंच वाटत नाही.”
“आश्चर्य कसलं त्यात? अहो, मीसुद्धा शेतकऱ्याचा मुलगा. या बहुतांश सगळ्या मुलांचे आईवडील शेतमजूर आहेत. तुमच्या वडिलांनी ही आश्रमशाळा सुरू केली, तेव्हा हे मजूर मुलांना शाळेत पाठवायलाच तयार नव्हते. त्यांच्या अनेक अडचणी होत्या — ही मुलं शाळेत गेली तर लहान भावंडांना कोण सांभाळणार? शेतातली, घरातली कामं कोण करणार? पण सगळ्यात मोठी अडचण होती, की मुलं शेती कशी शिकणार? नुसती शाळा शिकून काय उपयोग? त्याने पोट कसं भरणार?
मग काय, आजोबांनी त्यांना वचन दिलं — आम्ही मुलांना शाळेबरोबर शेती पण शिकवू. योगायोग असा की, इथे शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली. मी शेतकरी कुटुंबातलाच. माझं अर्धं शिक्षण शाळेत झालं आणि अर्धं शेतात. मला शिक्षण आणि शेती वेगळं वाटतंच नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात आम्ही इथे घाम गाळतो. व्यायामही होतो आणि ‘ड’ जीवनसत्वही मिळतं. त्या वेळात आम्ही पाठांतर करतो — कधी कविता, कधी पाढे. ही सगळी वेगवेगळ्या वयाची मुलं आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या इयत्तेत शिकत आहेत. पण एकत्र पाठांतरामुळे सगळ्यांना सगळ्याच कविता पाठ आहेत.”
पृथाला आता कंटाळा आला होता या मोठ्यांच्या गोष्टींचा. त्यात तिला अनेक गोष्टी समजतच नव्हत्या. ‘आईबाबा मुलांना शाळेत पाठवायला तयार का नव्हते? मी एखाद्या दिवशी म्हटलं की मला शाळेत नाही जायचं, तर आईबाबा किती ओरडतात! मग या मुलांचे आईबाबा त्यांना शाळेत का पाठवत नसतील? आणि
लहान मुलं कुठे कामं करतात घरात?’
पृथाच्या मनातले हे प्रश्न आजीने बरोब्बर ओळखले. ती हळूच पृथाच्या कानात म्हणाली, “पृथाबाई, आता फक्त सगळं बघा. मग आपण घरी गेलो की तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन हं!” पृथाही शहाणी होती. तिने लगेच मान डोलावली.
सगळेजण शाळेच्या स्वयंपाकघरात गेले. ते चांगलंच प्रशस्त होतं. या मुलांनी ते खूप स्वच्छ ठेवलं होतं. पृथाच्या आईला आणि आजीला त्याचं खूप कौतुक वाटलं. “अरे वा! छान लख्ख ठेवलंय की स्वयंपाकघर!” आजीने कौतुक केलं. दोन मुलं केळीची पानं मांडून पंगत वाढत होती. बेत होता — ज्वारीची भाकरी आणि दुधी भोपळ्याची भाजी.
“आमच्याकडे रोजचा स्वयंपाक मुलंच करतात. तीन तीन मुलांचा एक गट केला आहे. ज्या दिवशी ज्या गटाची पाळी असेल, त्या दिवशी ती मुलं सकाळच्या जादूच्या प्रयोगांना न येता नाश्ता बनवतात. रोजचा बेत भाजी-भाकरी, दुपारसाठी डाळ-भात-कोशिंबीर. रात्री थालीपीठ, धिरडी असं काहीतरी. भाजी आम्हीच पिकवतो. डाळ, तांदूळ, ज्वारी सरकारकडून मिळते. रविवारी आम्ही सगळे मिळून स्वयंपाक करतो. सणावाराला गावातल्या बायका मुद्दाम शाळेत येऊन गोडाधोडाचा स्वयंपाक करतात मुलांसाठी. ही शाळा फक्त आमची नाही तर संपूर्ण गावाची आहे.”
पवार गुरुजी मनापासून सांगत होते. हे सगळं ऐकून पृथाचे आई-बाबा थक्कच झाले. आपण जे ऐकतोय, पाहतोय, ते खरंच घडतंय यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.
पृथाने मात्र आपलं सगळं लक्ष भाकरी-भाजीवर केंद्रित केलं होतं. ‘या सगळ्यांसमोर आपण छान जेवून दाखवलंच पाहिजे, नाहीतर लाज जाईल आपली!’ असं वाटून ती दोन्ही हातांनी भाकरीशी झटापट करत होती.
“पृथा, जमतंय का?” छोटू दादाने चिडवलं.
“जमतंय बरं का!” पृथाने ठसक्यात सांगितलं खरं, पण हे सगळं आपल्याला झेपेल असं तिला मुळीच वाटत नव्हतं. तेवढ्यात छोटू दादाच म्हणाला, “पृथा, आज मी भरवू तुला?”
“नको नको, मी जेवीन स्वतःच्या हाताने,” पृथा घाईघाईने म्हणाली.
“तू जेवशीलच गं! पण आज तू माझ्या शाळेत आली आहेस ना, म्हणून मी तुला भरवतो. चालेल ना?”
“मी जेवले असते... म्हणजे येतंच मला जेवता. पण आता तुला भरवायचंच असेल तर भरव तू आपला!” पृथानं खांदे उडवत म्हटलं.
सगळेजण हसले आणि छोटू दादाने पृथाला घास भरवला.
डाॅ. गौरी प्रभू
९०८२९०५०४५