पृथा निघाली मुंबईला...

Story: छान छान गोष्ट |
17th August, 12:05 am
पृथा निघाली  मुंबईला...

आई बाबांची सुट्टी संपत आली होती आणि परत मुंबईला जायचा दिवस अगदी उद्यावर येऊन ठेपला होता. गुंड्याला सगळ्या बातम्यांचा वास लागतोच. मग ही बातमी त्याच्यापासून कशी लपेल? पृथाच्या बाबांनी भरायला घेतलेली बॅग, आई आणि आजीने करायला घेतलेला फराळ या सगळ्याचा अर्थ गुंड्याला बरोबर समजत होता. एरवी आजीने फराळ करायला घेतला की  कढईतला फराळ गुंड्याच्या ताटलीत येईपर्यंत तो अगदी आजीच्या मागे मागे करतो. आजीच्या हातची शंकरपाळी हा तर गुंड्याचा सगळ्यात आवडता खाऊ. पण आज त्या फराळात त्याला मुळीच रस नव्हता. उद्या पृथा निघून जाणार हे त्याला मुळी सहनच होत नव्हतं. पण काय करावं हे सुचतही नव्हतं! अंगणातल्या पेरूच्या झाडावर तो तरा तरा चढला. आपल्या नखांनी झाडाला खूप ओरबाडलं, झाडावरून आडव्या तिडव्या उड्या मारल्या, अंगण  उकरून ठेवलं!  त्याची ही तडतड आजोबा पाहत होते. त्यांची स्थिती तरी  कुठे वेगळी होती? ते मुद्दामच गुंड्याला म्हणाले, "अरे गुंड्या, तू का उगाच तडतड करतो आहेस? त्यापेक्षा या पृथाला सांग की तिची सुट्टी संपेपर्यंत इथेच राहायला! 

वास्तविक पृथाच्या आई-बाबांची सुट्टी संपली होती. पृथाची सुट्टी तर अजून बरीच शिल्लक होती. आजी, आजोबा, गुंड्या सगळ्यांनाच वाटत होतं की आई बाबांना जाऊ दे जायचं तर! पृथाने राहावं की तिची सुट्टी संपेपर्यंत! पण पृथा होती रडूबाई! ती थोडीच आई-बाबांशिवाय राहणार?

गुंड्याला पक्कं माहीत होतं. पृथा काही एकटी राहायला तयार व्हायची नाही. पण तरीही आजोबांनी तसं सुचवल्यावर  त्यांने अगदी आशेने पृथाकडे पाहिलं. 

आपण आई-बाबांशिवाय राहू शकत नाही हे मान्य करेल ती पृथा कसली? 

अगदी मोठ्या माणसांचा आव आणत ती म्हणाली,  "मी राहिले असते रे, पण आई बाबा माझ्याशिवाय मुळीच राहू शकत नाहीत. आई तर रडून रडून वाईट अवस्था करून घेईल स्वतःची! म्हणून जावं लागतंय मला. पुढच्या सुट्टीत नक्की येईन हां मी!"

मंगूलाही  वाईट वाटतच होतं पृथा जाणार म्हणून. पण ती गुंड्यासारखी तडतडी नव्हती ना! शहाणी होती! तिने मायेने चाटून चाटून पृथाला  निरोप दिला. पृथाला चाटण्यासाठी तिने मान हलवली तेव्हा तिच्या गळ्यातली घुंगरांची माळ छुम छुम वाजली. पृथा तिला म्हणाली "मंगे, तुला माझी आठवण आली ना की तू मान हलव म्हणजे मला तिथे बरोबर समजेल. मी लांब असले तरीही! माझ्याही पायात छुम छुम आहेत ना! मी ते वाजवेन. आजी कसं सांगते, मनाची देखील भाषा असते. ती मनालाच समजते. त्यासाठी शब्दांची गरज नाही एकमेकांच्या जवळ असण्याचीही गरज नाही. तशीच तुझी माझी 'छुम छुमची' भाषा. आपल्या दोघांनाच ती समजेल! मंगुने लगेच मान हलवून दुजोरा दिला.

आजीने पृथासाठी खूप सारा फराळ केला होता. चकली, लाडु, शंकरपाळी, कडबोळे, अनारसे, पाकातल्या पुऱ्या काय अन् काय! दिवाळीपेक्षा मोठा थाट! 

आजी पृथाला कुशीत घेत म्हणाली, "काय गं ठमे! फराळ खाताना माझी आठवण काढशील ना?"

"आजी, मी हा खाऊ डब्यात नेईन, माझ्या friends ना देईन. सगळ्यांना सांगेन की माझ्या आजीने केलाय."

या सुट्टीत पृथा आणि छोटू दादा यांची एकमेकांशी अगदीच घट्ट गट्टी झाली होती. पृथा आपल्याला सोडून लांब जाणार आहे या कल्पनेनेच छोटू दादा खूप हळवा झाला होता. त्याने पृथासाठी एक वेगळीच गंमत आणली होती. त्याने पृथासाठी खूप सारी पत्रं लिहिली होती. ती एका पाकिटात घालून तो घेऊन आला होता. 

"तुला माझी आठवण आली की यातलं एक पत्र काढून तू वाच. तुझ्या पुढच्या सुट्टीपर्यंत पुरतील एवढी पत्रं लिहिली आहेत मी!" 

"अरे पण मला वाचता कुठे येतं?" 

"म्हणजे माझी पत्रं तू वाचणारच नाहीस?" छोटू दादा अगदीच हिरमुसला! "मी 

तुझ्यासाठी लिहिलीत गं! "

"अरे असा उदास नको होऊस. आई वाचून दाखवेल ना मला! मला सगळ्या गोष्टी तीच तर वाचून दाखवते."

"मुळीच नाही. मी तुझ्यासाठी लिहिली आहेत पत्रं! ती तूच वाचायचीस! आता त्यासाठी तू वाचायला शिक! छोटू दादा हट्टाने म्हणाला. 

"बरं बाबा, शिकेन. आणि वाचेन तुझी पत्रं! मग तर झालं?"

"आणि तू लिहायला लागलीस ना, की मला एखादं पत्र पाठव!" 

"अरेच्चा! ते कसं पाठवायचं ?"

"अगं पोस्टाची पेटी असते. तुमच्या मुंबईच्या घराजवळ असेलच कुठेतरी. पत्र लिहायचं, ते पाकिटात घालायचं, त्यावर माझ्या शाळेचा पत्ता घालायचा आणि त्या पेटीत टाकून द्यायचं! की मग पोस्टमन काका ते पत्र घेऊन मला शोधत शोधत येतील माझ्या शाळेत! तुझ्या हाताने तू लिहिलेलं पत्र मला मिळेल तेव्हा मला तू भेटल्यासारखंच वाटेल. ना?

लिहिशील ना मला पत्र?"

"अं ! हो. लिहीन. तशी  A B C D येते मला लिहिता... आपल्याला हे पत्र लिहिणं वगैरे जमेल की नाही हे नक्की न कळल्याने पृथा थोडी गोंधळून गेली. 

इंग्रजीत नको हां मराठीतच लिही पत्र त्यासाठी अ आ इ ई शिक लिहायला! लिहिशील ना?

हो. शिकेन. मला शाळेत A B C D च शिकवतात. पण बाबा सांगत असतो 'मला घरी अ आ इ ई  लिहायला शिक' असं! आता मी शिकेन हं त्याच्याकडून आणि लिहीन तुला पत्र! 

छोटू दादाचा निरोप घेणं पृथाला जरा जडच गेलं. 

सुट्ट्या तर संपण्यासाठीच असतात. पण सुट्ट्यांमधे तयार झालेल्या आठवणी, त्या कुठे संपतात? त्या सतत सोबत असतात आपल्या. जितक्या जून्या होतात तितक्या छान मुरत जातात. आजीच्या लोणच्यासारख्या!


डाॅ. गौरी प्रभू 
९०८२९०५०४५