उंचावरची A B C…

“असंच असतं, पृथा. आपण फक्त आपल्या कष्टांच्या शिडीची उंची वाढवत न्यायची. की मग सगळ्या अडचणी आपोआप चिमुकल्या होत जातात...”

Story: छान छान गोष्ट |
03rd August, 12:01 am
उंचावरची  A B C…

मुलांना स्वयंपाकघरातील ही सगळी कामं चटाचटा करताना पाहून आई, आजी अगदी अचंबित झाल्या होत्या. त्यांना मुलांचं कौतुक तर वाटत होतंच, पण कोवळ्या वयात या मुलांना अशी कामं करावी लागतात याबद्दल वाईटही वाटत होतं.

“सरकार स्वयंपाकी का देत नाही पण शाळेसाठी?” आईने जरा घुश्शातच विचारलं.

पवार गुरुजी मिश्किलपणे हसत म्हणाले, “दिलाय हो सरकारने... पण तो बिचारा कोणत्यातरी सरकारी कार्यालयातल्या कुठल्याशा फायलीत अडकून पडलाय. गोष्टीतल्या राक्षसाच्या किल्ल्यात अडकलेल्या राजकुमारासारखा! त्याला सोडवायला कोण जाणार? तो जेव्हा कधी सुटून येईल, तेव्हा येवो बापडा. तो आला म्हणजे आम्हीच त्याला भाजी-भाकरी रांधून वाढणार आहोत. काय रे, मुलांनो?”

सगळ्या मुलांनी एका सूरात “होऽऽऽऽ!” चा राग आळवला.

ही मुले आणि हे पवार गुरुजी ‘कमाल’ होते. सगळ्याच अडचणींकडे गंमत म्हणून पाहत होते. कसली तक्रार नाही, की रडगाणं नाही. फक्त चारी बाजूंनी भरून राहिलेला आनंद!

“आहो, पण शिकवता तरी कसे तुम्ही एकटे? ही मुलं तर वेगवेगळ्या इयत्तेत आहेत म्हणता. मग वर्ग कुठे भरतात? आणि एकाच वेळी वेगवेगळ्या इयत्तेतील मुलांना कसे शिकवता तुम्ही?” बाबाने विचारलं.

पवार गुरुजी पुन्हा मिश्किल हसत, खांदे उडवत म्हणाले, “मी? मी कुठे शिकवतो? मुलंच शिकतात की स्वतः स्वतः! कधी कधी एकमेकांना शिकवतात. मी फक्त अडलं काही तर सांगतो. आणि वर्ग-बिर्ग काही नाही. ही बैठकीची खोली आणि ही बाहेरची पडवी — हेच आमचे वर्ग!”

वाड्याला भलीमोठी बैठकीची खोली होती. त्या खोलीची एक अख्खी भिंत काळ्या रंगाने रंगवली होती. ही भिंत म्हणजे फळा. कोणीही त्यावर आपापल्या उंचीनुसार काहीही लिहावे... दोन शिड्या सुद्धा होत्या, वर चढून उंचावर लिहिण्यासाठी!

“ह्या शिड्या आमच्या पवनने बनवल्या बरं पवार गुरुजींनी कौतुकाने सांगितलं.

पृथाच्या आईबाबांना धक्क्यामागून धक्के मिळत होते.

“तुम्ही मुलांना सुतारकामही शिकवता?”

“छे! मला कुठलं येतंय सुतारकाम? पण आमचा पवन उत्तम सुतारकाम शिकलाय. गावचे गणेश सुतार आहेत ना, त्यांच्याकडे. दिनू प्लंबर आहे ना? तो या शिवाला प्लंबिंगचं काम शिकवतो. आणि सातपुते मॅडम या विशालला गाणं शिकवतात. अहो, देवळात कोणताही कार्यक्रम असू दे, आमच्या विशालचं भजन झालं नाही असं होत नाही. या की, कधीतरी विशालचं गाणं ऐकायला!

मी म्हटलं ना, ही शाळा फक्त आमची नसून अख्ख्या गावाची आहे. सातवीच्या पुढची मुलं सकाळच्या वेळी गावातच त्यांच्या आवडीचं एखादं काम किंवा कला शिकतात. गावकरी त्यांना आनंदाने शिकवतात. हा छोटू तुमच्याकडे ‘गोपालन’ शिकतो ना, तसंच!”

“छोटू दादा आपल्याकडे शिकतो? काय ते? काय गो... गो... पालन... म्हणजे काय? छोटू दादा आपल्याकडे शिकतो हेच मला माहीत नव्हतं. उलट त्यानेच किती काय शिकवलंय मला! लगोरी... बासरी... आणि ते कुठल्यातरी पानाची सुरळी करून ‘पॅ पॅ पो...’ वाजवायला!”

“तेच तर, पृथा! हल्ली आपल्याला असं वाटायला लागलं आहे की पुस्तक, वही, पेन, पेन्सिल म्हणजेच अभ्यास, म्हणजेच शिकणं. पण खरं शिक्षण पुस्तकांमध्ये नसतंच मुळी. पुस्तकं फक्त मदतीला असतात.”

पवार गुरुजी समजावून सांगत होते खरं, पण पृथाचं लक्ष होतं कुठे?

भिंतीलगतच्या त्या शिडीवर चढून सगळ्यात उंचावर आपल्याला A B C लिहिता आली तर किती गम्मत येईल, नाही? असा विचार ती करत होती.

तेवढ्यात त्या पवन दादाला तिच्या मनातलं पुन्हा एकदा बरोब्बर ऐकू गेलं.

“तुला चढायचंय या शिडीवर, पृथा?” असं त्याने विचारलं. आणि पृथाने हो-नाही काही म्हणण्याआधीच, त्याने सरळ तिला उचलून त्या शिडीवर ठेवलं.

वरून म्हणतो कसा, “घाबरू नकोस. मी धरतो घट्ट शिडी. तू लिही बिनधास्त...”

छोटू दादाने पृथाला खडू दिला. तोही रंगीत खडू! पृथाची स्वारी खूश! मग तिने त्या भल्यामोठ्या भिंतीवर सगळ्यात उंचावर A B C लिहिली. सगळेच किती लहान-लहान दिसत होते इथून!

“तुम्ही सगळे चिमुकले दिसताय!” पृथा टाळ्या पिटत म्हणाली.

“असंच असतं, पृथा. आपण फक्त आपल्या कष्टांच्या शिडीची उंची वाढवत न्यायची. की मग सगळ्या अडचणी आपोआप चिमुकल्या होत जातात...”

पवार गुरुजी काय म्हणाले, ते पृथाला जरी समजलं नाही, तरी त्यांच्या विद्यार्थ्यांना मात्र पक्कं समजलं बरं का!


डाॅ. गौरी प्रभू 
९०८२९०५०४५