ते पावसाचं आगमन, तो दाही दिशांत पसरलेला मातीचा सुगंध, “हीरीरी… पा… पा…” म्हणत शेतात जाणारा तो शेतकरी वातावरण आणि मन प्रसन्न करून टाकायचा. आज या गोंधळात ते दिवस मौल्यवान वाटू लागले.
हीरीरी... पा... पा...” म्हणत खांद्यावर फटकूर आणि नांगर घेऊन जाणारा शेतकरी पावसात पाहायला मिळायचा. जसं आपण शाळेत असताना शेती, नांगरणारा शेतकरी, नदी, डोंगर इत्यादी दाखवून चित्र काढायचो. अगदी त्याच चित्रासारखा शेतकरी पावसात प्रत्येक गावात दिसायचा. शेतीवर आधारित एखादी कविता वाचली की त्यात हमखास एक ओळ वाचायला मिळायची, ‘निसर्गाने हिरवी चादर घेतली’. म्हणजेच पावसात झाडांना नवीन पालवी यायची आणि शेताभातांनी सृष्टी हिरवीगार दिसायची.
पूर्वी माणसाचं जीवन जगण्याचं एकमेव साधन म्हणजे शेती होतं. शेती, गुरं यांच्या सहाय्याने माणसं आपलं जीवन जगत असायची. “सावलीतून जावं आणि सावलीतून यावं” या वाक्याचं पालन करणारी माणसं त्या काळी पाहायला मिळायची. म्हणजेच सूर्योदय होण्यापूर्वी शेतात कामाला जायचं आणि सूर्यास्त झालं की शेतावरून घरी यायचं, असं जीवन होतं.
शेतात एखाद्या झाडाखाली बसून शांत, थंडगार वातावरणात आणि पक्ष्यांच्या मधुर आवाजात केलेलं जेवण, संध्याकाळी घेतलेला चहा... त्याला एक वेगळाच आनंद आणि चव असायची. जरी संपूर्ण आयुष्य शेतात गेलेलं असलं तरी, कधी मोठ्या आजाराने स्पर्श केला नाही.
आज मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतं. आज आपला निसर्ग हिरव्या चादरीत नाही, तर घरं आणि बिल्डिंग्स यांनी भरलेला दिसतो. इतके नवनवीन प्रकल्प उभे राहिले की शेती करणारी जमीन त्यात हरवून गेली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं ते त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे आणि त्या अन्यायाला आपण सर्वजण कुठेतरी कारणीभूत आहोत.
दिवसरात्र एक करून शेतात मेहनत करणारा शेतकरी आपल्यासाठी धान्य उगवतो. पाऊस डोक्यावर घेतो, स्वतःच्या आजारपणाचा विचारही करत नाही. कारण शेती हेच त्याचं जगण्याचं साधन असतं. मिळालेल्या पैशांतून तो मुलांचे शिक्षण करतो. तरीसुद्धा, जेव्हा कुणी व्यापारी त्या धान्याला खूपच कमी किमतीत विकत घेतो आणि स्वतः मात्र दहापटीने विकतो, तेव्हा त्या शेतकऱ्याच्या आयुष्याला शून्य अर्थ उरतो.
त्यात जर नासाडी झाली, पाऊस कमी पडला किंवा जनावरांनी शेती उद्ध्वस्त केली, तर त्याची मेहनत क्षणात वाया जाते. अशा अनेक घटनांमुळे बरेच शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलतात.
जेव्हा शेतकरी शेतीवर सर्व पैसा गुंतवतो, विश्वासाने, की काही उत्पन्न होईल आणि तेव्हा जर संकट आलं तर, त्याने कुणाच्या आधारावर जगावं? सरकारच्या?
सरकारने शेतकऱ्यांसाठी योजना काढलेल्या आहेत, पण त्या प्रत्यक्षात किती उपयोगी पडतात हे सर्वांनाच माहीत आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान झालं आणि तो सरकारकडे मदतीसाठी गेला, तर त्याला एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात धावावं लागतं. “या ऑफिसमध्ये जा, त्या अधिकाऱ्याला भेटा” असं सांगितलं जातं. हे सगळं अशिक्षित माणसाला शक्य होत नाही. मग कंटाळून गप्प राहतात.
सरकारने शेतकऱ्यांना एवढं नाचवू नये की, ते स्वतःहून त्या योजनेचा लाभ घेण्यास नकार देतील.
या शेतकऱ्यांनी शेती करणं थांबवलं, तर आपल्या सर्वांवर त्याचा गंभीर परिणाम होईल. आपण किती दिवस उपाशी राहू शकतो? यावर विचार करायलाच हवा. कारण शेतकरी फक्त स्वतःपुरती नव्हे, तर सगळ्यांची भूक मिटवण्यासाठी शेती करतो.
आज मोठमोठे प्रकल्प उभारण्यासाठी सरकार जमिनी घेते आहे. थोड्यांना पैसे दाखवून, तर काहींवर दबाव टाकून. काही जण तर बाहेरच्यांना जमीन विकून पैसा घेतात. आपल्या पूर्वजांनी ज्या जमिनी जपून ठेवल्या, त्या आज आपण पैशाच्या मोहात विकतो. विचार करा पैसा एकदाच मिळतो, पण जमीन राहिली, तर ती आयुष्यभर उपयुक्त ठरते.
१९६० पासून आज २०२५ पर्यंत प्रचंड बदल झाले. आपल्या आजी-आजोबांनी किंवा आई-वडिलांनी जे जीवन जगलं आणि आपण आज जे जगतो, यात फरक आहे. एवढ्या कमी कालावधीत हे सगळं घडलं. मग विचार करा २०५० मध्ये काय परिस्थिती असेल?
आज मुलं शाळेत जाताना पाठीवर दप्तर घेतात, उद्या ऑक्सिजन सिलेंडर लावून जावं लागेल. जनावरं असतील का? झाडं तरी दिसतील का?
शेती करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. येणाऱ्या काळात कोण शेती करणार? आपले पूर्वज निसर्गाच्या सानिध्यात ८०-१०० वर्षं जगले, आता आपण ५०-६० वर्षं तरी जगू शकणार का?
रोज नवनवीन आजार, वाढते तापमान, कमी ऑक्सिजन... या सगळ्या परिस्थितीचा विचार करा. आणि जर हा अंदाज खोटा ठरवायचा असेल, तर आजपासूनच आपल्या विचारांत आणि कृतीत बदल घडवावा लागेल.
पैशाच्या नादात डोंगर कापणं, झाडं तोडणं, प्रकल्पासाठी जमीन देणं हे थांबवा. शेतकऱ्यांना फसवू नका. त्यांच्याकडून योग्य भावाने धान्य खरेदी करा.
निसर्गच नसेल, तर श्वास कुठून घेणार? ऑक्सिजन विकत किती दिवस घेणार?
विचार केला नाही, तर एक दिवस असा येईल की पैसे असतील – पण श्वास नसेल...
- हर्षदा सावंत
सावंतवाडा, मांद्रे.