माझं बालपण आणि आजचं वास्तव

आज काही मोठं मिळालं तरी अपूर्ण वाटतं कारण बालपणी आपण फक्त आजच्यासाठी जगायचो. पण आज मात्र आपण फक्त उद्यासाठी जगतो. कालचं विसरतो आणि आजचा क्षण गमावतो.

Story: लेखणी |
12 hours ago
माझं बालपण आणि आजचं वास्तव

बालपण म्हणजे आठवणींचा गुलमोहर, अगदी निरागस असं हास्याचं गाणं जे काळजाला नेहमी स्पर्शून जाते. लहान असताना आपल्याला फारसं काही समजत नसतं. पण मन मात्र स्वच्छ आणि निर्मळ असतं. हळूहळू मोठे होतो जग बदलताना बघतो आणि मग जाणवतं की, खरं आनंदाचं आणि शांतीचं जग तर आपलं गोड बालपण होतं. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाने भरलेल्या वास्तवाशी तुलना केली तर बालपण म्हणजे एक हरवलेला स्वर्ग आहे.

माझं बालपण म्हणजे सकाळी पक्ष्यांच्या मधुर आवाजाने जाग येणं, आईच्या मायेच्या हातचा गरम पोळीचा वास आणि वडिलांच्या कुशीतला सुरक्षितपणा. दप्तराचे वजन कमी असले तरी डोळ्यांतील स्वप्नं मोठी होती. पाटी, पुस्तकांबरोबर आम्ही पावसात चिंब भिजायचो, कागदाच्या होड्या बनवायच्या आणि गावच्या मुलांबरोबर खेळताना वेळ कसा जायचा हे आम्हाला कळतच नव्हतं.

त्या काळी टीव्हीवरची कार्टून, मालिका आणि रविवारच्या दिवशी भावणारे महाभारत, रामायणाच्या वेळची घरातली शिस्त आठवली की आजही गालावर हसू येतं. आमचं बालपण कोणत्याही डिजिटल स्क्रीनच्या अधीन नव्हतं. खेळात हरणं, मैत्रीमध्ये भांडणं, गट्टी भट्टी करणे आणि पुन्हा गळाभेट घेणं हे सगळं इतकं खरं वाटायचं की त्यात स्वार्थ, अहंकार, राग, स्पर्धा यांना अजिबात जागा नव्हती.

माझ्या शाळेचे दिवस मला अजूनही आठवतात. वर्गात नवीन वही उघडताना जो सुगंध यायचा, काळ्या फळ्यावर शिक्षकांनी लिहिलेली अक्षरं आणि दर रविवारी शाळेचा गणवेश धुण्याची आईची धावपळ हे क्षण जिवंतच वाटतात. शाळा म्हणजे पुस्तकातली अक्षरं शिकवणं नव्हे तर माणूस घडवणं होतं. माझ्या बालपणीच्या शिक्षकांनी मला केवळ पाठ्यपुस्तकाचं ज्ञान दिलं नाही तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही दिला. स्कूलबसची धावपळ, मैत्रिणींसोबत शेअर केलेले टिफिन, वार्षिक स्नेहसंमेलनाची रंगीत तयारी या आठवणींचं सोनं आजच्या वास्तवातही मनातल्या खजिन्यात सुरक्षित ठेवलंय.

आज मोठे झालो आहोत. जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, स्वप्नं मोठी झाली आहेत. पण त्याचबरोबर काळजात एक शांत सलही घर करून बसलेली आहे ती म्हणजे हरवलेल्या बालपणाची आठवणी. आज मोबाईल, लॅपटॉप, सोशल मीडिया हे सगळं हातात आहे. पण मनात शांतता नाही. वेळ असूनही भेटायला वेळ नाही, नातं असूनही संवाद नाही आणि हास्य असूनही त्यामागे नकळत एक खोटा मुखवटा आहे. बालपणात छोट्या छोट्या गोष्टी मिळाल्या तरी आनंद साजरा व्हायचा. आज काही मोठं मिळालं तरी अपूर्ण वाटतं कारण बालपणी आपण फक्त आजच्यासाठी जगायचो. पण आज मात्र आपण फक्त उद्यासाठी जगतो. कालचं विसरतो आणि आजचा क्षण गमावतो.

बालपणी आई-बाबा, आजी-आजोबा, भाऊ-बहीण हे सगळे घरात सतत एकत्र असायचे. प्रत्येक सण एकत्र येऊन साजरा व्हायचा. आज सण आला तरी मोबाइलवर मेसेज करून शुभेच्छा दिल्या जातात. एकत्र येणं दुर्मिळ झालंय. नात्यांमध्ये प्रेम आहे पण वेळ नाही आणि वेळ आहे तेव्हा समोरचं माणूस मोबाईलमध्ये आहे. आज प्रत्येकजण कुठे तरी पोहोचण्यासाठी धावत आहे. यश, पैसा, नावलौकिक मिळवण्याच्या धावपळीत मनाची शांती हरवत चाललीय. बालपणी साधी गोष्ट जसे की, पतंग उडवणं, पावसात भिजणं, बिस्किटातली पिठी खाणं यात आनंद होता. आज लाखोंची वस्तू घेतली तरी क्षणिक समाधान वाटतं. जगणं मोजमापात आलंय आणि आयुष्य जड बनलंय.

कधी कधी एखादं जुनं छायाचित्र पाहिलं, एखादी जुनी वही सापडली किंवा शाळेची घंटा ऐकली तरी मन मागे धावतं त्या निरागस, निष्पाप, आनंदी दिवसांकडे. आठवणी हा आपल्या बालपणाचा वारसा आहे. त्या जपल्या पाहिजेत कारण त्या आठवणी आपल्याला आजही सावरतात. बालपणाकडे परत जाता येत नाही हे खरं. पण त्या आठवणी जपून आपण आपलं आजचं वास्तव सुंदर करू शकतो. जगण्याची गती कमी करता येणार नाही पण मनात शांतता ठेवता येते. आठवणींना सोबत ठेवून आपण आजही निरागसतेने, प्रेमाने आणि माणुसकीने जगू शकतो.

"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" ही संत तुकारामांची ओळ मनात घर करून बसलेली आहे. बालपण मागे गेलंय पण त्याचा सुगंध आजही आपल्याला बळ देतो. आजचं वास्तव कठीण आहे पण त्या निरागस आठवणींनी आपण हे जग सुंदर करू शकतो. बालपणी आपण जगायचो पण आज आपण जगण्याचा प्रयत्न करतो. त्या दोन वाक्यांमधला फरक आपल्या आयुष्याचा प्रवास आहे.


- वर्धा हरमलकर 

भांडोळ