बारावा दिवस…

घाबरू नकोस बारा दिवस झालेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल. राजेशनेही त्यांच्या आत्म्याला शांती लाभो म्हणून प्रार्थना केली.

Story: साद अदृश्याची |
12 hours ago
बारावा दिवस…

राजेश रोजच्याप्रमाणे चहा हातात घेऊन एक एक झुरके घेत, दुसऱ्या हातामध्ये वर्तमानपत्र चाळीत होता. सकाळचे सात वाजले असतील. एवढ्यात त्याने भावपूर्ण श्रद्धांजली असलेले पान उघडले. पाहता तो थक्कच झाला. त्यांच्या अंगाला घाम सुटला आणि दातखिळी बसली. तो खुर्चीवरून खाली कोसळला. आवाज होताच काय झाले म्हणून पहायला राजेशची आई धावून आली.  तर चहा सांडला होता व राजेश एकदम घट्टच झाला होता. त्याचे अंग थंड पडले होते.

आईने त्याला उचलले. पाणी व साखर दिली व कॉटवर झोपविले. राजेश हा गरीब रिक्षाचालक. आपल्या आईबरोबर साळ इथे भाड्याने राहत होता. ते मूळचे महाराष्ट्रातील. राजेश रोज सकाळी आठ वाजता अस्नोडा येथे रिक्षा स्टॅन्डवर जायचा व रात्री दहा वाजेपर्यंत परत यायचा. एखादा वेळ रात्रीचे भाडे मिळाले तर त्याला घरी पोहचायला उशीर व्हायचा. त्याने आईला सांगून ठेवले होते की आपल्याला रात्री थांबू नकोस जेव व झोप.

हल्ली राजेशला घरी पोहोचायला बारा वाजायचे. आईने विचारल्यावर तो तिला रात्रीचे एक भाडे मिळते असा सांगायचा. दहा दिवसांपूर्वी राजेशला घरी पोहोचायला खूपच उशीर झाला होता. त्याला दहा वाजता अस्नोड्याहून एका वयस्कर जोडप्याला पणजीला सोडावे लागले होते. त्याला पणजीहून  परतायला एक वाजले. आता दीड वाजेपर्यंत घरी पोहोचू असे राजेशचे विचारचक्र चालू होते.

एवढ्यात त्याला वळणावर कोणीतरी तरुण हात दाखवताना दिसला. रात्री बिचारा कुठे जाणार? कदाचित मला चार पैसे मिळतील म्हणून त्याने रिक्षा थांबवली. राजेशने तू कुठे चाललास ? असे विचारले. तो तरुण रिक्षात बसला व मला गोवा गेटकडे सोडा म्हणाला. "एवढ्या रात्री तू कसा काय फिरतोस"? असे राजेशने विचारले. तेव्हा तो माझे फिरणे रात्रीचेच आपण दोडामार्गाला चाललो होतो असे त्यांने सांगितले. 

राजेशने आपण साळमध्ये राहतो. जरा पुढे जाऊन तुला गेटपाशी सोडतो असे सांगितले. अशातऱ्हेने राजेश व त्या तरुणाच्या गोष्टी सुरू झाल्या. तो युवक फक्त हं हं एवढेच म्हणत होता. 

 एक पंधरा मिनिटांनी राजेशने झटकन ब्रेक लावला. अचानक कोणीतरी रस्त्याच्या मध्येच उभा होता. राजेशने रिक्षा थांबवली नाही. जरा कडेला घेतली व गतीने रिक्षा हाकू लागला. राजेश पुरता घाबरला होता. त्या युवकाने काय झाल्याचे विचारले. राजेशने सांगितले की, रस्त्याच्या मध्ये उभे असलेल्याचे पाय वाकडे म्हणजे परते होते म्हणून मी थांबलो नाही. तो खरा युवक नसून भूत असेल. तो घाबरला होता. पण पाठीमागे रिक्षात गिऱ्हाईक असल्यामुळे धीर होता.

 तो तरुण हसला व म्हणाला चल सोड मला दोडामार्गाला. राजेश मनातल्या मनात देवाचे नाव पुटपुटत होता. तो म्हणाला घाबरलास तू? हा, हा पोहोचव मला लवकर. राजेशने बळ एकटाविले   व तसाच गतीने जाऊन गेटवर पोहोचला. तो तसा धाडसी व भूतप्रेतांना न मानणारा होता. तो युवका पोहोचता क्षणी म्हणाला पैसे उद्या देतो. माझा पगार झाला नाही. राजेशही गप्पच राहिला. कारण त्या भयानक प्रसंगी त्यांनी अर्जुनाच्या कृष्णाप्रमाणे साथ दिली होती. राहू दे नंतर दे म्हणत राजेश घरी जाऊन झोपला सुद्धा.

मागच्या दहा दिवसांपासून हे आता त्यांचे रोजचे झाले होते. वळणावर पोहोचता तो युवक रोज हात दाखवायचा व गोवा गेटवर राजेश त्याला पोहोचवायचा. राजेश त्याला आपल्या दिवसाभराच्या गोष्टी सांगायचा व त्याला पोहोचवून घरी यायचा. त्याला त्याचे नाव, गाव काही माहिती नव्हते. त्याचे पैसेही तो घेत नसे. कारण गोवा गेट त्याच्या घराहून फक्त दीड किलोमीटर दूर होते. पगार झाल्यावर हा मला  तरुण नक्की पैसे  देणार असे राजेशला वाटले होते.

आज सकाळी वर्तमानपत्र वाचताना राजेशला धक्का बसला. कारण भावपूर्ण श्रद्धांजली वाचताना कु. अरुण व कु. रवी ही दोन नावे त्यांने पाहिली. ते चेहरे पाहून तो थक्कच झाला होता. कारण दहा दिवसांपूर्वी रस्त्याच्या मधोमध दिसलेला तो युवक तरुण होता. सगळ्यात मोठा धक्का म्हणजे गेले दहा दिवस रोज त्याच्या रिक्षेत बसून गोवा गेटपर्यंत जाणारा रवी याचा पण फोटो त्याखाली बारावा दिवस असे होते. ज्याला तो माणूस समजत होता तो ही भूतच होता. म्हणूनच राजेशची दातखिळी बसली होती व शुद्धच हरपली होती. राजेशला नंतर दत्ताच्या देवळामध्ये नेऊन तीर्थप्रसाद दिल्यावर तो शुद्धीवर आला. राजेशचा मित्र त्याची विचारपूस करण्यासाठी आला असता त्यांनी सांगितले की बारा दिवसांपूर्वी त्याच रस्त्यावर अरुण व रवी या युवकांचा अपघाताने मृत्यू झाला होता. तेच अतृप्त आत्मे तुला दिसले असावेत. घाबरू नकोस बारा दिवस झालेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल. राजेशनेही त्यांच्या आत्म्याला शांती लाभो म्हणून प्रार्थना केली. आपण रात्री आठ वाजताच घरी येईल असे त्यांनी मनोमन ठरवले.


श्रुती नाईक परब