ताई भाटकारीण

आयुष्यभर मोठ्या गर्वाने स्वतःला भाटकारीण म्हणवून घेणारी ताई शांतपणे पहुडली होती. जशी नुकतीच झोपली आहे. देह निष्प्राण पण तेच तेज, तोच बोलका, करारी चेहरा. जणू काही आत्ताच आल्या गेलेल्यांची वास्तपुस्त करुन निवांत झालाय...

Story: व्यक्ती एके व्यक्ती |
12 hours ago
ताई भाटकारीण

सकाळी सकाळी फोन वाजला. साखर झोपेतच होते मी. थोडी काळजी वाटली, फोन उचलला. माझी बहीण होती फोनवर. म्हणाली "ताई भाटकारीण गेली." पटकन काही कळले नाही, सकाळची वेळ आणि त्यात अशी बातमी! डोक्यात शिरायला आणि समजायला वेळ गेला थोडा. बहीण सांगत होती म्हापश्यात होती मुलीकडे. थोडे बरे वाटेना झाले आणि गेली. ऐकल्यावर मग झोप कसली? पटापट आवरले आणि निघालो म्हापश्याला.

" ताई भाटकारीण" काय वजन होते हो ह्या नावाला आमच्या पंचक्रोशीत! आसपासच्या गावात एकही माणूस नसावा की त्याला ताई भाटकारीण माहीत नाही आणि असे एकही घर नसावे की त्यावर ताईचे उपकार नाहीत. आम्ही लहानपणापासून ओळखत होतो. आधी कानाने आणि नंतर मोठे झाल्यावर प्रत्यक्ष डोळ्यांनी. तशी माझ्या आजीची मैत्रीण ती चांगली, आमचे घरही तसे खाऊन-पिऊन सुखी त्यात ताई आणि आजी दोघीही म्हापसा भागातील माहेरवाशिणी. त्यामुळे छान सुत होते त्यांचे.

मध्यम उंची, गोरापान गोल चेहरा, शक्यतो फिक्कट रंगाचे लुगडे आणि गळ्यात जाड सोन्याची चेन अशी ही ताई भाटकारीण नावाला स्त्री पण कर्तृत्वाने पुरुषापेक्षाही पुढे अशी. आणि त्याच कर्तृत्वाला साजेसे भेदक डोळे. खरोखर एका हिकमती, जाणकार माणसाचे डोळे होते ते. कोणीही फसवू शकत नव्हते तिला. समोरच्याला पाहिल्यावरच ओळखायची विलक्षण हातोटी होती तिच्याकडे. 

वर सांगितल्याप्रमाणे आमच्या आज्जीच्या वयाची ताई मूळ म्हापश्या जवळील एका गावातील तालेवार, सावकारी घरातील. वडील व्यावसायिक, सावकार वगैरे. पैसा खूप. सोन्याचा का कसला चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली ताई, उभरत्या वयात लग्न होऊन आली फोंडा महालात. सासरही अगदी तोडीसतोड मिळाले. त्यात पतिराज एकुलते एक.. अर्थात तसा गोतावळा मोठा होता सर्व नणंदाची लग्ने झाली होती. तसेच वाडवडिलांच्या वाटण्याही झाल्या होत्या. त्यामुळे जे आहे ते घरचेच. ते कुठेही जाणार नव्हते.

सगळे सुरळीत चालू होते अचानक आक्रित घडले. एका छोट्या आजारपणाच्या निमित्ताने त्यांचे यजमान विश्वनाथराव देवाघरी गेले. आभाळ कोसळले ताईंवर. घरात सासू-सासरे, तीन मुले पदरात, गाई, गुरे, शेती, नोकर-चाकर काय आणि कसं करायचं? परत व्यवहाराची तशी फारशी माहिती नव्हती यजमानांच्या. सासऱ्यांची मदत म्हणाल तर झालेल्या आघाताने आधीच खचलेले ते. बरे देवाच्या मागे तरी किती लागणार मदतीसाठी? शेवटी 

ताईनाच काहितरी पावले उचलणे आवश्यक होते.

थोडे दिवस त्रास झाला. गुळाची ढेप संपल्यावर मुंगळे कसे भराभर पळून जातात तसा गोतावळा हळूहळू कमी व्हायला लागला. मोजकेच उरले. परिस्थिती पाहून ताईनी स्वतःला सावरले. जे कोण होते त्यांना हाताशी धरुन परत व्यवहारात, जमीन-जुमल्यात लक्ष घातले. अर्थात त्याकाळी सहज शक्य नव्हते ते. भुजंग भरपूर होते टपलेले डंख मारायला. त्यात ताई विधवा. पण बाई डगमगली नाही अर्थात सावकाराचे रक्त होते ते थोडेच भीक घालणार असल्यांना?

हळूहळू ताईंनी सांभाळला डोलारा अर्थात उत्पन्न भरपूर होते. त्यात विश्वनाथ भाऊंनी काही व्यवहार करुन जमिनी घेऊन ठेवल्या होत्या. अर्थात त्या नावावर करणे कठीण होते पण अंगभूत चातुर्याने म्हणा किंवा जे काही मोजकेच आपले होते त्यांच्या सहकार्याने म्हणा ताईंनी जमवले खरे.

आमचा पुरश्या गावकरही त्यातलाच. धनी गेले तरी वाड्यावर रोजची हजेरी. कुठे जमीन आहे, कुठे कोण कुळ आहे सगळे पाठ त्याला. खूप फायदा झाला त्याचा ताईंना. पण ताईंनी सुद्धा सांभाळला त्याला भावासारखा. त्याचा मुलगा दिलीप खूप हुषार. शिक्षणाची सगळी सोय केली ताईंनी त्याची. परदेशात जाऊन आला, मोठा अधिकारी झाला पण ताई भाटकारीणला मात्र नाही विसरला.

रक्त जरूर सावकाराचे पण त्याला परोपकराचा रंग होता. उगाच नाही ताई प्रसिद्ध झाल्या पंचक्रोशीत! त्यांच्या घरात एक पद्धत होती. दुपारच्या वेळेस कोणीही दारावर आला मग तो कोणीही असो त्याला जेवल्याशिवाय धाडायचे नाही. पती पाठोपाठ हा नियम कटाक्षाने पाळला ताईंनी आणि आजची पिढी सुध्दा पाळते आहे ते. अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच लक्ष्मी येते घरात असे ताई भाटकारीण नेहमीच म्हणे.

अश्या ताईंनी गावागावात भरपूर मदत केली लोकांना. आमच्या गावात आरोग्य केन्द्र सुरु करण्यात ताईंचा मोठा हातभार होता. जेवढी व्यवहारी तेवढीच सुधारक वृत्तीची होती ताई भाटकारीण. तिच्या जमान्यात निवडणूक मग ती पंचायतीची असो, पतपेढीची असो अथवा आमदारकीची ताईंचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होतच नसे. आधी देव आणि मग भाटकारीण, समीकरणच होते तसे. बाकी काही असो पण ताईंना खोट्याचा खूप राग. येणे वसुलीच्या वेळेस, खंड घालताना नीट लक्ष असे तिचे. नुसते नजरेनेच जोखायची आणि हिशेब करायची. मग गरजेला मागा तिच्याकडे अगदी सढळ हात. पण व्यवहारात चोख.

दैवाने पतीसुख दिले नाही पण अपत्यसुख चांगले मिळाले तिला. तीनही मुले कर्तबगार निघाली. अर्थात त्या मागे ताईचे आशीर्वाद ही कारणीभूत होते म्हणा. आणि कोणाचे चांगले केले तर ते फुकट जात नाही हो. ताईला तिच्या कर्माचे चांगले फळ मिळाले. अन्नपूर्णा पण पावली तिला आणि लक्ष्मीही.

विचार करता करता म्हापसा आले सुद्धा. घरी गेलो मुलीच्या. समोर ताईला ठेवले होते. आयुष्यभर मोठ्या गर्वाने स्वतःला भाटकारीण म्हणवून घेणारी ताई शांतपणे पहुडली होती. जशी नुकतीच झोपली आहे. देह निष्प्राण पण तेच तेज, तोच बोलका, करारी चेहरा. जणू काही आत्ताच आल्या गेलेल्यांची वास्तपुस्त करुन निवान्त झालाय...


- रेशम जयंत झारापकर

मडगाव, गोवा.