आजच्या धकाधकीच्या जीवनात संवाद ही केवळ एक औपचारिकता बनली आहे. शब्दांची रेलचेल असली तरी, त्यांच्यामागे दडलेला खरा अर्थ मात्र हरवत चालला आहे. माणूस बोलतो खूप, पण मनातलं खरं सांगायचं राहूनच जातं, ज्यामुळे नात्यांमधील समजूतदारपणा कमी होत चालला आहे
मुखातून शब्द निघतात, सांगणारे सांगत जातात... सांगण्याचा अर्थ समजला किंवा न समजला, सांगणारे मात्र अर्धवटच बोलतात.
माणूस म्हटला की संवाद हा सगळीकडे येतोच. पण खरोखर आजच्या काळात माणूस मनातून संवाद साधत असतो का? या प्रश्नाचा विचार करणे आज महत्त्वाचे ठरते. कारण आज प्रत्येक माणूस धावपळीचे जीवन जगत आहे आणि त्यामुळे प्रत्येक माणसाचा होणारा संवाद हा अर्धवट वाटतो, कारण त्याचा खरा अर्थ व्यक्त होतच नसतो. आजच्या काळात 'माफ करा', 'चूक झाली' असे म्हणणे देखील सहज वाटते, कारण त्यामागील खंत व्यक्त होतच नाही.
तोंडी संवाद कमी झालेला असून, मनाचा संवाद आज जवळजवळ हरवत चाललेला आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात आज तोंडी संवादाला तडा गेलेला आहे. घराघरातील संवाद आज हरवत चाललेला आहे आणि भावना व्यक्त करणे म्हणजे आज अपयशाचे कारण बनलेले आहे. अर्थात माणूस संवाद साधत जातो पण जे सांगायचे असते ते अर्थपूर्ण शब्दांमध्ये व्यक्त करत नाही.
'स्वतःची काळजी घ्या', 'गरज भासली तर आम्ही आहोत', असे अनेक काळजी करणारे शब्द माणसांच्या तोंडून ऐकू येतात. पण या शब्दांमागचा खरा अर्थ मात्र हरवलेला दिसतो. दुसऱ्याची काळजी करणे आणि दुसऱ्याची समजूत काढणे ही गोष्ट आज फक्त एक औपचारिकता बनलेली आहे. प्रत्येक माणूस संवाद साधतो, बोलतो पण त्यामागील खरा अर्थ मात्र अपूर्णच राहतो.
समाजात व्यवहार करताना शब्दसंपदा हवीच, पण ती अर्थपूर्ण असली पाहिजे. प्रत्येक माणसाने संवाद साधताना मनापासून आणि अर्थपूर्ण पद्धतीने दुसऱ्याकडे व्यक्त होणे गरजेचे असते. नाती जपण्यासाठी व जोडण्यासाठी बोलणे पुरेसे नसते, तर प्रत्येक माणसाने एकमेकांना समजून घेणे, अनुभवणे आवश्यक असते. तेव्हाच कुठं शब्दांमागील लपलेला खरा अर्थ उमजू शकतो.
आज माणूस जरी कितीही प्रगती करत असला, स्वतःला मोठा समजत असला, तरी प्रत्येक वेळी संवाद साधताना दुसऱ्याला त्याचा खरा अर्थ कळावा या विचाराने त्याने संवाद साधला पाहिजे. स्वतःच्या मनातील भावनांना उघडपणे दुसऱ्याकडे व्यक्त केले पाहिजे. फक्त मुखातून शब्द बाहेर काढून त्याचा अर्थ थांबवू नये, तर प्रत्येकाने शब्दांचा अर्थपूर्ण वापर संवादातून केला पाहिजे, तेव्हाच कुठं माणुसकी आणि समजूतदारपणा यांना स्थान मिळू शकते.
शेवटी, माणूस म्हटला की थोडाफार स्वार्थ येतोच. पण म्हणून शब्दांचा अर्थ अर्धवट ठेवू नये. या गोष्टीकडे प्रत्येकाने सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. जर समाजातील लोकांनी संवादाच्या अर्थपूर्णतेवर लक्ष केंद्रित केले, तर सहजच माणसा-माणसांतील नाती विश्वासू व समजूतदार बनू शकतील.
- पूजा भिवा परब
पालये-पेडणे