आयआरबीचा निलंबित कॉन्स्टेबल निकेश च्यारी अखेर बडतर्फ

सोनसाखळी चोरी भोवली : प्रशिक्षण अधीक्षकांचा आदेश


5 hours ago
आयआरबीचा निलंबित कॉन्स्टेबल निकेश च्यारी अखेर बडतर्फ

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पेडणे तालुक्यात सोनसाखळी चोरी आणि अल्पवयीन मुलाच्या अपहरणात सहभागी असलेला भारतीय राखीव दलाचा (आयआरबी) निलंबित कॉन्स्टेबल निकेश च्यारी याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. याप्रकरणी उत्तर गोवा जिल्हा अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या अहवालानुसार, आयआरबी कमांडंट तथा प्रशिक्षण अधीक्षक सुचेता देसाई यांनी आदेश जारी केला आहे.
पेडणे तालुक्यातील तोरसे येथे गुरुवार, १७ रोजी सकाळी वासंती रामा शेट्ये यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून एका व्यक्तीने दुचाकीवरून पळ काढला होता. महिलेने आरडाओरड केल्यामुळे तेथील दोन युवक मदतीला धावले. त्यांनी आपल्या दुचाकीवरून चोराचा पाठलाग केला. सदर घटनेची माहिती मोपा पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि त्या दोघा युवकांनी जंगलात पळालेल्या संशयिताला पकडले. त्याची चौकशी केली असता तो निलंबित आयआरबी पोलीस काॅन्स्टेबल निकेश च्यारी असल्याचे समोर आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलिसांच्या चौकशीत कबूल केेले की, गेल्यावर्षी कोरगाव येथून त्याने एका लहान मुलाचे अपहरण केले होते. त्यावेळी पेडणे पोलिसांनी त्याला अटक केली होती. आयआरबी पोलीस कॉन्स्टेबल निकेश च्यारीला यापूर्वीच सेवेतून निलंबित करण्यात आले होते. सोनसाखळी चोरीच्या घटनेनंतर मोपा पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी निकेश च्यारी याच्यासंदर्भातील अहवाल उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांना पाठविला. अधीक्षक गुप्ता यांनी सदर अहवालावर आपली टिपणी नोंदवून आयआरबी कमांडंटकडे सविस्तर अहवाल पाठविला. या अहवालाची दखल घेऊन आयआरबीचे कमांडंट तथा प्रशिक्षण अधीक्षक सुचेता देसाई यांनी निकेश च्यारी याला सेवेतून बडतर्फ केल्याचा आदेश जारी केला.

हेही वाचा