पेडणे : पोरस्कडे माऊली मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवार, १५ रोजी रात्री रस्ता ओलांडत असताना पादचारी दिगंबर बाबुली आरोंदेकर (८३) यांना मोटरसायकलची जोरदार धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. गोमेकॉत उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकी स्वारावर पेडणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावर माऊली मंदिराजवळ, पोरस्कडे येथे अपघात झाला. जॉन बॅप्टिस्ट गुंडी साल्वो लोबो (३१ वर्षे, तांबोसे) हे आपल्या हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. जी. ए. ११ जे. ३५००) वरून अतिशय वेगाने जात होते. माऊली मंदिर पोरस्कडे येथे पोहोचल्यावर त्यांच्या दुचाकीची धडक दिगंबर बाबुली आरोंदेकर (पोरस्कडे) या पादचाऱ्याला बसली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. गोमेकॉत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संशयित मोटरसायकल चालकालाही गंभीर दुखापत झाली.
पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकी चालकावर गुन्हा नोंद केला. पुढील तपास उपनिरीक्षक प्रथमेश पार्सेकर हे निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.