नानेरवाडा-पेडणे येथे भरदिवसा चोरी; ३.७० लाखांचा मुद्देमाल लंपास

दरवाजाचे कुलूप तोडले कटरने : नियाेजन करून चोरी केल्याचे समोर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
नानेरवाडा-पेडणे येथे भरदिवसा चोरी; ३.७० लाखांचा मुद्देमाल लंपास

चोरीची माहिती देताना रेणुका शिरोडकर.        

पेडणे : पेडणे तालुक्यातील नानेरवाडा येथे भरदिवसा एका घरात चोरीची घटना घडल्याने संपूर्ण बाजारपेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेणुका रामा शिरोडकर यांच्या राहत्या घरात सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोराने मुख्य दरवाजाचे कुलूप कटरने तोडून घरात प्रवेश केला आणि अंदाजे ३ लाखांचे मंगळसूत्र व ७० हजार रोख रक्कम लंपास केली.
रेणुका शिरोडकर या त्या दिवशी आपल्या बाजारपेठेतील दुकानात गेल्या होत्या. परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा आणि कुलूप तोडलेले दिसून आले. घरात प्रवेश करताच त्यांनी पाहिले की कपाटे उघडी होती, कपडे व साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले होते. त्यांनी घरातील वस्तूंची पाहणी केली असता मंगळसूत्र व रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना माहिती दिली व पेडणे पोलिसांना घटनेची कल्पना दिली.
भाडेकरूला खाेलीत बंद केले
शिरोडकर कुटुंब तळमजल्यावर राहते, तर वरच्या मजल्यावर एक भाडेकरू कुटुंब राहते. चोरीच्या वेळी चोरांनी त्या भाडेकरूच्या दरवाजास बाहेरून कडी लावून त्यांना आतच अडकवून ठेवले होते, त्यामुळे कोणी खाली येऊ शकले नाही. ही चोरी नियोजन करून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चोरांनी घरात कुणी नसल्याची माहिती आधीच घेतलेली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
सीसीटीव्हीचा अभाव
चोरीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरांना धाडसाने दिवसा चोरी करण्याचा मार्ग मोकळा झाला. अशी चर्चा आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पंचनामा केला. चोरीचा तपास सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेरे आणि संशयित व्यक्तींच्या हालचाली तपासण्याचे काम सुरू केले आहे. भरदिवसा, तेही बाजारपेठेतील रहिवासी भागात घडलेली ही चोरी पालिकेच्या कार्यक्षेत्रात असूनसुद्धा सुरक्षा यंत्रणा ढासळल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या असून त्यावर अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे.

सालेली येथही भरदिवसा चोरी
सालेली येथे ७ जुलै रोजी दोघा बुरखाधारी चोरांनी भरदिवसा घरात घुसून एका महिलेवर सूरीने हल्ला करून सुमारे अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या घटनेतील संशयितांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.