भाडेकरूंची नोंदणी न करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश

जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस : ‘पथिक’ सॉफ्टवेअरवर माहिती सादर करणे बंधनकारक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
भाडेकरूंची नोंदणी न करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश

मडगाव : गोव्यात आलेले काही गुन्हेगार चुकीची माहिती देऊन वास्तव्य करत असल्याचे प्रकार उघड होत असल्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस (आयएएस) यांनी कडक पावले उचलली आहेत. त्यांनी हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, धार्मिक निवासस्थाने आणि खासगी घरमालक यांना भाडेकरू आणि पाहुण्यांची पूर्ण ओळख पडताळणी करून, ती माहिती पोलिसांना आणि ‘पथिक’ सॉफ्टवेअरवर सादर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यात बाहेरून येणारे काही लोक खोटी कागदपत्रे सादर करून हॉटेल किंवा घरे भाड्याने घेत आहेत. त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांची ओळख पटवताना अडचणी येतात. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व भाडेकरू व पर्यटकांची नोंदणी आवश्यक असल्याचा आदेश दिला आहे.
‘पथिक – प्रोग्राम फॉर अ‍ॅनालिसिस ऑफ ट्रॅव्हलर्स अँड हॉटेल इन्फॉर्मेटिक्स’ या सॉफ्टवेअरमध्ये पाहुण्यांची माहिती भरणे हॉटेल चालक, लॉजिंग बोर्डिंग यांच्यासाठी बंधनकारक आहे. यात आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, मतदार ओळखपत्र इत्यादी वैध ओळखपत्र तपासून नोंद करावी लागेल.
जर कोणी भाडेकरू किंवा पाहुण्यांची माहिती नोंदवली नाही, तर त्यांच्यावर बीएनएस २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांना अशा प्रकरणांचा तपास करून अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
बँक एटीएम सुरक्षेसाठी स्वतंत्र आदेश
दक्षिण गोव्यातील सर्व राष्ट्रीय बँकांना त्यांच्या एटीएममध्ये २४ तास सुरक्षा पाळत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशात अतिरिक्त सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन आणि इलेक्ट्रॉनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.