गोवा : वर्षभरात वाढले २०० हून अधिक स्टार्टअप्स

१५४ स्टार्टअप्सना ‘डीपीआयआयटी’ मान्यता : सर्वांत जास्त आयटी क्षेत्रातील स्टार्टअप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14 hours ago
गोवा : वर्षभरात वाढले २०० हून अधिक स्टार्टअप्स

पणजी : राज्यात गेल्या वर्षभरात २३७ स्टार्टअप्स (startup) वाढले आहेत. त्यापैकी १५४ स्टार्टअप्सना उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) मान्यता मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाने दिली आहे.
स्टार्टअप्ससह इतर उद्योग आणि क्षेत्रांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील ५६ उद्योग आणि १९७ क्षेत्रांमध्ये हे स्टार्टअप्स कार्यरत आहेत. या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यापर्यंत गोव्यातील स्टार्टअप्सची संख्या १,१६६ होती आणि ४९७ स्टार्टअप्सना डीपीआयआयटी मान्यता मिळाली होती. आता एका वर्षानंतर ही संख्या वाढून स्टार्टअप्सची संख्या वाढून १,४०३ पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी ६५१ स्टार्टअप्सना डीपीआयआयटी मान्यता प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे, ६५१ डीपीआयच्या स्टार्टअप्सपैकी २७० स्टार्टअप्स महिला उद्योजकांनी सुरू केले आहेत.
जे स्टार्टअप चांगली वाढ नोंदवतात, अधिक रोजगार निर्मिती करतात, त्यांना डीपीआयआयटी मान्यता मिळते. ही मान्यता मिळाल्यानंतर सरकार स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत या उद्योगांना अनेक सवलती देते. यामध्ये कर्जमाफी, सरकारी व्यवहार अधिक सोपे करणे, सरकारी निविदांमध्ये सहभागी होण्याची संधी, कर्मचाऱ्यांना स्टॉक देण्यासारखे फायदे यातून मिळतात. यात सर्वांत जास्त आयटी क्षेत्रातील ५७ स्टार्टअपना मान्यता मिळाली आहे. अन्न आणि पेय क्षेत्रातील ४८, व्यवसाय आणि वाणिज्य सेवा क्षेत्रातील ३२, आरोग्य क्षेत्रातील ३३ आणि पर्यटन क्षेत्रातील ३१ स्टार्टअपना डीपीआयआयटी मान्यता मिळाली आहे.

पणजीत सर्वाधिक स्टार्टअप्स
सर्वांत जास्त स्टार्टअप गोव्याच्या राजधानीत सुरू झाले आहेत. पणजी शहरात २२८, मडगाव शहरात १५७, मुरगाव शहरात ८१ आणि म्हापसा शहरात ६७ स्टार्टअप्स आहेत. उर्वरित स्टार्टअप्स दक्षिण आणि उत्तर गोव्याच्या इतर भागांत आहेत.


हेही वाचा