पणजीः कला अकादमीचा खुला रंगमंच कोसळून दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ‘कला राखण मांड’ या संस्थेच्या वतीने येत्या गुरुवारी, १७ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता कोसळलेल्या रंगमंचाच्या अवशेषांना कलात्मक श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या सरचिटणीस सेसिल रॉड्रिगीस यांनी दिली आहे.
या वेळी ‘आऊटक्राय’ या १५ मिनिटांच्या अभिनव कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकार व कलाप्रेमी आपल्या भावना व्यक्त करतील. याच दिवशी मागील वर्षीही ‘क्राय’ या कार्यक्रमाद्वारे अशाच पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली होती.
या कार्यक्रमात गोव्यातील कलाकार सहभागी होणार असून, सर्वांनी कला अकादमी संकुलात एकत्र येऊन मूक श्रद्धांजली द्यावी, असे आवाहन कला राखण मांडचे निमंत्रक देविदास आमोणकर यांनी केले आहे. यावेळी शक्यतो सर्वांनी पांढऱ्या व काळ्या रंगाच्या पोषाखात यावे आणि सोबत फुले आणावीत, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.