इतर गुन्ह्यांचा तपास ८६ टक्के : सहा महिन्यांत ११ खून, २२ बलात्काराच्या घटना
गोवन वार्ता
मडगाव : दक्षिण गोवा पोलिसांनी १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली ४३२ गुन्हे दाखल करून ३७३ गुन्ह्यांचा तपास लावला. तपासाचे हे प्रमाण ८६.३४ टक्के असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यात दोन टक्क्यांनी वाढ आहे. ११ खून, २२ बलात्कार यासह ५४ गंभीर गुन्ह्यांचा १०० टक्के तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोड्या, वाहन चोर्या व अन्य प्रकारच्या चोर्यांचा तपास लावण्याचे प्रमाण ५६.२५ टक्के आहे.
दक्षिण गोव्यात वरील कालावधीत ११ खून, ३ खुनाचा प्रयत्न, १ सदोष मनुष्यवधाचा, तर २२ बलात्कारांची मिळून ५४ गंभीर गुन्ह्याची नोंद झाली. सर्व गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले. २ चोर्या, भरदिवसा ५ चोर्या, रात्रीच्या वेळी १० चोर्या, घरफोडी ११, ३३ वाहन चोर्या, ३ सोनसाखळी हिसकावणे, तर मोबाईल व अन्य प्रकारच्या ३२ चोर्या मिळून वरील कालावधीत ९६ चोर्या नोंद झाल्या. यातील ५४ चोर्यांचा तपास लागला. हे प्रमाण ५६.२५ टक्के आहे. या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये तपासाची टक्केवारी कमी असली तरी पोलिसांनी पोलीस नियंत्रण कक्ष आणि पोलीस स्थानकाच्या वाहनांची, तसेच स्थानिक गुप्तचर विभागाच्या कर्मचार्यांची गस्त वाढवली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची वेळोवेळी चौकशी करण्यात येते. संशयास्पदरीत्या फिरणार्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
वरील कालावधीत फसवणुकीचे ४३ गुन्हे दाखल झाले असून ४१ गुन्ह्यांचा तपास लागला. विश्वासघात केल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले. यातील ३ गुन्ह्यांचा तपास लागला. गोंधळ घालण्याचे ५ प्रकार घडले. सर्व प्रकरणांतील दोषींवर कारवाई झाली. मारहाणीत जखमी करण्याचे २३ गुन्हे नोंद असून सर्व संशयितांवर कारवाई झाली. याशिवाय भारतीय न्याय संहितेच्या इतर कलमांनुसार ७९ प्रकरणांची नोंद असून, त्यातील ७४ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला. दरम्यान, अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी ८३८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाबाबत बाँड घेण्यात आला आहे.
अपहरणाची १७, बलात्काराची २२ प्रकरणे नोंद
दक्षिण गोव्यात मागील सहा महिन्यांच्या कालावधीत अपहरणाची १७ प्रकरणे नोंद आहेत. यातील १६ प्रकरणांत दक्षिण गोवा पोलिसांनी संशयितांवर कारवाई केली. लैंगिक अत्याचाराची २२ प्रकरणे नोंद असून सर्व संशयितांवर कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मटका, जुगारप्रकरणी १३७ जणांवर कारवाई
दक्षिण गोवा पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांसह मटका, जुगार, शस्त्र कायदा उल्लंघन, बाल संरक्षण कायदा अशा विविध कलमांखाली २१५ गुन्हे नोंद केले असून १९५ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला. ही टक्केवारी ९० टक्के आहे. यात अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी १६ जणांवर, बाल संरक्षण कायद्यांतर्गत पाच जणांवर, आयटी कायद्यांतर्गत २६ गुन्हे नोंद आहेत.
वाहन नियमांचे उल्लंघन, १४,१७७ जणांवर कारवाई
वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा महिन्यांत १४,१७७ जणांवर दंडात्मक कारवाई केली. ‘कोटपा’ कायद्यांतर्गत २,५९३ जणांवर, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्या ३,३३७ जणांवर, तर कचरा टाकणार्या ३,५६९ जणांवर पोलिसांनी कारवाई केली.
सहा महिन्यांत ३५ अपघाती मृत्यू
दक्षिण गोवा पोलिसांकडून जानेवारी ते जून या कालावधीत ३५ अपघाती मृत्यूच्या प्रकरणांची नोंद झाली असून सर्व प्रकरणातील संशयितांना अटक करण्यात आली आहे. इतर गंभीर जखमी होण्याचे ७५ अपघातांची नोंद असून त्यातील ६६ अपघातांतील संशयितांवर कारवाई झाली आहे.