एनआयओच्या तक्रारीनंतर पणजी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) येथे राष्ट्रीय स्तरावरील स्टेनोग्राफर आणि ज्युनियर सचिवालय साहाय्यक (जेएसए) पदांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला डमी उमेदवार म्हणून परीक्षा देण्याचा प्रयत्न दोघांनी केला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील सुनील कुमार आणि प्रशांत कुमार यांना अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एनआयओच्या प्रशासनाचे नियंत्रक राकेश शुक्ला यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, मंगळवारी सकाळी दोनापावला येथील एनआयओमध्ये स्टेनोग्राफर आणि ज्युनियर सचिवालय साहाय्यक (जेएसए) पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या. उमदेवारांची तपासणी केली असता, संशयित सुनील कुमार याच्याकडे बनावट कागदपत्रे सापडली. त्याची कसून चौकशी केली असता, तो प्रशांत कुमार याच्याऐवजी परीक्षा देण्यासाठी आल्याचे समोर आले. त्याची माहिती पणजी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक, साहीन शेट्ये आणि काॅन्स्टेबल विकास नाईक या पथकाने संशयित सुनील कुमार आणि प्रशांत कुमार यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.